भायखळा फायरिंगप्रकरणी सुपारी देणार्या मुख्य आरोपीस अटक
आर्थिक वादातून दहशत निर्माण करण्याची योजना होती
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मे 2026
मुंबई, – भायखळा येथे समीर मोहम्मद आसिफ खान याच्यावर झालेल्या फायरिंग कटातील मुख्य आरोपी सैफ शरीफ खान याला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी कोलकाता येथून अटक केली. आर्थिक वादातून सैफ यानेच दोन शूटरला समीर मोहम्मदवर गोळीबार घडवून आणला. दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर सैफला किल्ला कोर्टाने शनिवार 30 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी दोन शूटर सादिक लियाकत शेख आणि झिशान अन्वर खान या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या अटकेने सैफ हा मुंबईतून कोलकाता येथे पळून गेला होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांनी सांगितले.
समीर हा कुख्यात गुंड आसिफ मोहम्मद ऊर्फ आसिफ दाडी याचा मुलगा आहे. डॉकयार्ड रोड परिसरात त्याचे स्वतचे एक कार्यालय आहे. मंगळवारी सायंकाळी त्याच्या ऑफिसच्या दिशेने जात होता. यावेळी बाईकवरुन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला. त्याने दोन गोळ्या फायर केल्या, त्यातील एक गोळी त्याच्या पायाला लागली होती. गोळीबारानंतर मारेकरी बाईकवरुन पळून गेला होता. जखमी झालेला समीर हा जे. जे हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याने तिथे घडलेला प्रकार डॉक्टरांना सांगितला. गोळीबाराची माहिती मिळताच भायखळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी समीरची पोलिसांनी चौकशी केली, या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या गोळीबाराच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संमातर तपासाचे आदेश देताना आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्यास सांगितले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे, युनिट तीनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, युनिट दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक शरद धराडे, सुहास माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, रामदास कदम, राकेश देशमुख, सहाय्यक फौजदार अरुण घाटकर, कृतिबास राऊळ, दिपक पालांडे, पोलीस हवालदार सुहास कोंकणकर, गिरीश मोरे, सचिन सरवदे, पंकज भोसले, शिर्के, सुनिल हरड, स्वप्निल ढेरे, अनिकेत मारे, महिला पोलीस शिपाई दिपीका ठाकूर पोलीस शिपाई विकास चव्हाण, राहुल पाटील, किरण शेलार, लक्ष्मण दाईंगडे, मारुती खेडकर यांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन गोळीबारानंतर मुख्य शूटर सादिक शेख आणि झिशान खान या दोघांना माहीम येथून अटक केली होती. चौकशीत त्याने समीर मोहम्मद याच्यावर गोळीबार केल्याचे उघडकीस आले. या दोघांकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे, बाईक आणि मोबाईल फोन जप्त केले. तपासात समीर मोहम्मद आणि सैफ खान यांच्यात आर्थिक वाद होता. गेल्या काही दिवसांपासून हा वाद विकोपास गेला होता. त्यातून त्याने समीर मोहम्मद याच्यावर गोळीबार करण्याची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे त्याने सादिक आणि झिशानला गोळीबाराची सुपारी दिली होती. त्यानंतर सादिकने समीर मोहम्मदवर गोळीबार केला होता.
या गोळीबारानंतर सैफ पळून गेला होता. तो मुंबईहून कोलकाता येथे पळून गेल्याची माहिती युनिट तीनच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकातील निलेश मोरे, श्यामसुंदर भिसे, सुहास कोंकणकर, विकास चव्हाण, दराडे आदीचे एक पथक कोलकाता येथे गेले होते. या पथकाने त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले होते.
याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 30 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या फायरिंग गुन्ह्यांतील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध लवकरच भक्कम पुराव्यासह आरोपपत्र सादर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.