नवजात अर्भकाला राजावाडी हॉस्पिटलमध्ये टाकून महिलेचे पलायन

सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या महिलेचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मे 2026
मुंबई, – नवजात अर्भकाला राजावाडी हॉस्पिटलमध्ये टाकून एका अज्ञात महिलेने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या महिलेविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या महिलेचा शोध सुरु केला आहे. हॉस्पिटलमधील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान पुरुष जातीच्या या नवजात बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

जितेंद्र विष्णू पाटील हे घाटकोपर येथील पंतनगर पोलीस वसाहतीत राहत असून सध्या टिळकनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी रात्री ते नाईट ड्युटीवर हजर झाले होते. यावेळी त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये कॅज्युअल्टी विभागात पाठविण्यात आली होती. रात्री नऊ वाजता त्यांच्याकडे विष्णू श्रीरामफेरम पटेल नावाचा एक तरुण आला आणि त्याने त्याचा चुलत भावावर हॉस्पिटलचय अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याला पाहण्यासाठी तो तिथे आला होता. यावेळी त्याला 40 क्रमांकाच्या वॉर्डसमोरील बाथरुममध्ये एक नवजात अर्भक रडत असल्याचा दिसला. त्याने तिथे जाऊन पाहणी केली असता पुरुष जातीचा नुकतेच जन्म घेतलेला अर्भक तिथे होता. त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हते.

हा प्रकार लक्षात येताच त्याने तिथे उपस्थित नर्सला ही माहिती दिली. या नर्सला अर्भकाला ट्रेमध्ये ठेवून हॉस्पिटलमध्ये नेले होते. त्या अर्भकावर एनआयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती चांगली असून तो सुखरुप आहे. त्यानंतर त्याने ही माहिती जितेंद्र पाटील यांना दिली. या माहितीनंतर त्यांनी अर्भकाला जन्म देणार्‍या महिलेचा शोध घेतला, तेथील रजिस्ट्ररमध्ये कोणीही महिलेने नुकतेच बाळाला जन्म दिल्याची नोंद नव्हती. अज्ञात महिनेने त्या अर्भकाला राजावाडी हॉस्पिटलमधून आणून त्याला तिथे टाकून पलायन केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

या घटनेनंतर जितेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध नवजात अर्भकाचे कायदेशीर पालकत्वाचे कर्तव्य न बजाविता, अर्भकाच्या सुरक्षेची कुठलीही काळजी न घेता त्याला उघड्यावर टाकून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हॉस्पिटलचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page