मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मे 2026
मुंबई, – भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या कमिटीमध्ये असल्याची बतावणी करुन महानगरपालिकेने जप्त केलेला फ्लॅट देतो असे सांगून सिव्हील कॉन्ट्रक्टरची एका भामट्याने सव्वाअकरा लाखाची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुशल सावंत नावाच्या भामट्याविरुद्ध चेंबूर पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
अशोक जमिदार सिंह हे सिव्हिल कॉन्ट्रक्टर असून ते चेंबूर परिसरात राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु ाहेते. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांची कुशल सावंतसोबत ओळख करुन दिली होती. या ओळखीदरम्यान कुशलने त्यांना तो भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या कमिटीमध्ये आहे. चेंबूर नाका येथे गुरुदेव नावाची एक सोसायटी असून या सोसायटीमधील सहा फ्लॅट महानगरपालिकेने जप्त केल्या आहेत. त्यापैकी एक फ्लॅट त्यांना देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांच्या पत्नीच्या नावाने चेंबूर नाका येथील गुरुदेव सोसायटीमधील एका फ्लॅटचे खरेदीखत बनवून दिले होते.
या खरेदीखतावर त्यांच्या पत्नीची स्वाक्षरी घेतली होती. मात्र फ्लॅटचे संबंधित कागदपत्रे त्यांनी त्यांना दिले नाही. या फ्लॅटसाठी त्याने त्यांच्याकडून 17 जुलै ते 8 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत कॅशमध्ये पाच लाख तर ऑनलाईन सहा लाख वीस हजार असे अकरा लाख वीस हजार रुपये घेतले होते. या पेमेंटनंतर त्याने त्यांना गुरुदेव सोसायटीच्या फ्लॅटची चावी दिली होती. फ्लॅटवर गेल्यानंतर त्यांना तिथे दुसरा कुलूप लावल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कुशलकडे विचारणा केली असता तो त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना फ्लॅटसाठी घेतलेले पैसे दिले नाही किंवा फ्लॅटचा ताबा दिला नाही. या प्रकारानंतर त्यांनी त्याच्याविरुद्ध चेंबूर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून कुशल सावंतने अशाच प्रकारे मंगतप्रभात लोढा यांच्या नावाने महानगरपालिकेने जप्त केलेले फ्लॅट देतो असे सांगून गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.