फ्लॅटसाठी घेतलेल्या 36 लाखांच्या अपहारप्रकरणी महिलेस अटक

म्हाडामध्ये भरण्यासाठी पैसे नसल्याची बतावणी करुन घातला गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मे 2026
मुंबई, – गोरेगाव येथील म्हाडा कॉम्प्लेक्स, स्वराज सहकारी सोसायटीमध्ये म्हाडाकडून अलोट झालेल्या फ्लॅटची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका वयोवृद्धाची सुमारे 36 लाखाची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपी महिलेस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. सुधा सुनिलकुमार दुबे असे या महिलेचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा सुधाचा पती सुनिलकुमार दुबे हा सहआरोपी असून या दोघांनी संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या फ्लॅटसाठी या पती-पत्नीने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

66 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार जनार्दन हरिचंद्र काटकर हे गोरेगाव परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्या मालकीचा गोरेगाव येथील दिडोंशी, कृष्णा नागरी सहकारी सोसायटीमध्ये एक फ्लॅट होता. ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी या फ्लॅटची विक्री केली होती. या फ्लॅटच्या विक्रीनंतर त्यांना गोरेगाव लिंक रोड, पहाडी परिसरात एक फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्या परिचित एजंटला सांगितले होते. सप्टेंबर 2024 रोजी या एजंटने त्याच्या परिचित एजंटच्या मदतीने त्यांना म्हाडा कॉम्पलेक्सच्या स्वराज्य सहकारी सोसायटीचा एक फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट त्यांना आवडला होता, त्यामुळे त्यांनी तोच फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

चौकशीदरम्यान तो फ्लॅट सुधा दुबे आणि सुनिलकुमार दुबे यांच्या मालकीचा होता. ते दोघेही नवी मुंबईतील घनसोली परिसरात राहत होते. 2023 साली त्यांना म्हाडाच्या लॉटरीमध्ये तो फ्लॅट 32 लाख 36 हजार रुपयांना मिळाला होता. एजंटकडून त्यांना फ्लॅटची किंमत 38 लाख रुपये सांगण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे ऑक्टोंबर 2024 रोजी त्यांची पहिल्यांदा भेट झाली. यावेळी सुधाने त्यांना तो फ्लॅट म्हाडाकडून प्राप्त झाला असून म्हाडामध्ये रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी फ्लॅटची विक्रीचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून मिळालेली रक्कम म्हाडा कार्यालयात जमा करुन त्यांचा व्यवहार पूर्ण करु असे सांगितले.

त्यांच्यात फ्लॅटची खरेदी-विक्रीचा व्यवहार 38 लाखांमध्ये झाला होता. त्यामुळे जनार्दन काटकर यांनी तिला ऑक्टोंबर 2024 रोजी 17 लाख आणि डिसेंबर 2024 रोजी एकोणीस लाख रुपयांचे दोन धनादेश दिले होते. उर्वरित दोन लाख रुपये फ्लॅटचा ताबा तसेच सर्व कागदपत्रे दिल्यानंतर देण्याचे ठरले होते. याच दरम्यान त्यांनी वकिलामार्फत सेल अग्रीमेंट, जनरल पॉवर ऑफ अ‍ॅटनी, ऍफिडेव्हीड, इन्डेमनिटी बॉण्ड, डिक्लेरेशन, ट्रान्स्फर अग्रीमेंट आदी कागदपत्रे बनविण्यास दिले होते. वकिलांकडून फ्लॅटचे कागदपत्रे प्राप्त होताच त्यांनी स्वाक्षरी केली होती.

जवळपास संपूर्ण व्यवहार पूर्ण होऊनही सुधा आणि सुनिलकुमार दुबे यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. विविध कारण सांगून ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. त्यामुळे जनार्दन काटकर हे त्यांच्या एजंटसह नवी मुंबईतील दुबे यांच्या घरी गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना दुबे कुटुंबिय तिथे राहत नसल्याचे समजले. या दोघांनी फसवणुकीच्या उद्देशाने त्यांच्याशी फ्लॅटचा व्यवहार करुन त्यांच्याकडून 36 लाख रुपये घेऊन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच जनार्दन काटकर यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुधा दुबे आणि सुनिलकुमार दुबे या दोघांविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या 36 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पती-पत्नीचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सुधा दुबे हिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page