फसवणुकीच्या गुन्ह्यांत मंत्रालयातील तोतया कर्मचारी ठगाला अटक
म्हाडाच्या पाच फ्लॅटसाठी 60 लाखांचा अपहार करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मे 2026
मुंबई, – पाण्यात वाहून गेलेल्या तीन झोपड्याच्या मोबदल्यात तीन फ्लॅटसह इतर दोन फ्लॅट स्वस्तात देतो असे सांगून म्हाडाच्या पाच फ्लॅटसाठी एका वयोवृद्ध महिलेकडून घेतलेल्या 60 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी जतीन बाबू सोलंकी या ठगाला मालाड पोलिसांनी अटक केली. जतीनने स्वतला तो मंत्रालयातील महसूल विभागातील कर्मचारी असल्याची बतावणी करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सईदा रफिक नाडियाडवाला (69) ही वयोवृद्ध महिला तिच्या कुटुंबियांसोबत मालाड येथे राहते. जतीन हा गेल्या 23 वर्षांपासून त्यांच्या परिचित असून तो नालासोपारा येथे राहतो. घरी येणे-जाणे असल्याने त्यांच्यात कौटुंबिक संबंध होते. त्याच्यावर तिचा प्रचंड विश्वास होता. तिचे कुर्ला, पाईपलाईन येथे तीन झोपड्या होत्या. त्या झोपड्या पावसात वाहून गेल्याने त्यांच्याकडे काही कागदपत्रे नव्हती. ही माहिती जतीनला माहित होती, एप्रिल 2025 रोजी जतीन हा त्याचा मित्र विजय पवारसोबत तिच्या घरी आला होता. त्याने तो मंत्रालयात महसूल विभागात कामाला लागला असून म्हाडाच्या फ्लॅटबाबतचे त्याच्याकडे काम असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने तिला झोपड्याच्या मोबदल्यात म्हाडाचे तीन फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले.
अंधेरी, मालाड आणि गोरेगाव येथील एव्हरशाईन नगरात म्हाडाच्या इमारती असून तिथेच त्यांना फ्लॅट देण्याचे तसेच प्रत्येक फ्लॅटमागे बारा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. फ्लॅटचे अॅलोटमेंट लेटर मिळाल्यानंतर तिला ही रक्कम द्यावे लागतील असे सांगितले. मे 2025 रोजी त्यांनी गोरेगाव येथील डी मार्टसमोरील सिग्मा टॉवर इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरील 1501, 1502 आणि 1503 क्रमांकाचे फ्लॅट दाखविले होते. या तीन फ्लॅटसाठी इतर दोन फ्लॅट विक्रीसाठी आहेत. ते दोन्ही फ्लॅट त्यांना स्वस्तात देतो असे सांगून त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. कुर्ल्यातील पाण्यात वाहून गेलेल्या तीन झोपड्याच्या मोबदल्यात तीन आणि इतर दोन फ्लॅट स्वस्तात मिळत असल्याने तिने त्याला पैसे देण्याची तयारी दर्शविली होती.
ठरल्याप्रमाणे सईदाचा मुलगा आदिलकडून 28 लाख 95 हजार, पती रफिककडून 5 लाख 52 हजार, सून आयेशाकडून 1 लाख आणि मुलगी शबानाकडून 10 लाख असे 47 लाख 47 हजार जतीनच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले होते तर कॅशमध्ये 15 लाख रुपये देण्यात आले होते. म्हाडाच्या पाच फ्लॅटसाठी तिने त्याला कॅशसहीत बँक ट्रान्स्फरद्वारे 60 लाख 47 हजार रुपये दिले होते. नोव्हेंबर 2025 रोजी त्याने त्यांना फ्लॅटचे अॅलोटमेंट घेण्यासाठी वांद्रे येथील बीकेसी, एमएमआरडीए कार्यालयाजवळ बोलाविले होते. मात्र तिथे जतीन आला नाही. मंत्रालयात एक महत्त्वाची फाईल चोरी झाल्याचे सांगून त्याने त्यांना पुढच्या आठवड्यात येण्यास सांगितले. त्यानंतर तो त्यांना सतत वेगवेगळे कारण सांगून टाळत होता.
सईदाकडून फ्लॅटविषयी सतत विचारणा होत असल्याने त्याने नंतर त्याचा मोबाईल बंद ठेवला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची माहिती मिळताच त्याने तिला पैसे देण्याचे आश्वासन दिले, मात्र दिलेल्या मुदतीत पैसे दिले नाही. त्यामुळे तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जतीन सोलंकीविरुद्ध म्हाडाच्या पाच फ्लॅटसाठी घेतलेल्या 60 लाख 47 हजाराचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच जतीन हा पळून गेला होता. गेल्या दिड महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर वॉण्टेड असलेल्या जतीन सोलंकीला बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जतीनने मंत्रालयातील महसूल विभागात कामाला असल्याची बतावणी करुन अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.