प्रेमसंबंधाची विचारणा म्हणून पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला

हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी पतीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जून २०२६
मुंबई, – पतीच्या अनैतिक प्रेमसंबंधाची विचारणा केली म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात किचनमधील वरवंटा घालून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात राजकुमारी दिलीप राजभर ही २३ वर्षांची महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर मुलुंडच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी पती दिलीप रुपेश राजभर (२२) याला भांडुप पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजकुमारी ही तिचा पती दिलीप आणि अडीच वर्षांचा मुलगा दिव्यांश यांच्यासोबत भांडुपच्या हनुमाननगर, विश्‍वकर्मा मंदिराजवळील राजरतन बेकरी, आदर्श मित्र मंडळात राहते. ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे तर दिलीप हा कडीयाकाम करतो. गेल्या चार महिन्यांपासून दिलीपचे नंदीनी नावाच्या एका महिलेशी प्रेमसंबंध सुरु असल्याची माहिती तिला समजली होती. त्यामुळे तिने त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यात तिला या दोघांचे फोटो दिसले होते. हा प्रकार त्याच्या लक्षात येताच त्याने मोबाईलमधील सर्व फोटो डिलीट केले होते. रविवारी ३१ मेला तिने दिलीपला त्याच्या प्रेमसंबंधाबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती.

रागाच्या भरात त्याने तिला शिवीगाळ करुन तिचे डोके भिंतीवर आपटले होते. तुला संपविल्याशिवाय त्याला नंदीनीसोबत राहता येणार नाही असे बोलून त्याने तिचे कपडे काढून तिला पुन्हा पट्ट्याने बेदम मारहाण केली होती. जिवाच्या भीतीने तिने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तिची मान पकडून तिला पुन्हा घरी आणले. त्यानंतर किचनमधील वरवंटाने तिच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ होऊनही त्याने तिच्या कपाळावर, डोळ्यावर आणि नाकावर वरंवटाने हल्ला केला. त्यात ती जागीच कोसळली होती.

हा प्रकार स्थानिक रहिवाशांकडून समजताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव धेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी रक्तबंबाळ झालेल्या राजकुमारीला तातडीने मुलुंडच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहे. तिच्या चौकशीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पती दिलीप राजभर याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच दिलीपला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page