खार पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारावर निलंबनाची कारवाई
दोन हजाराची मागणी करुन एक हजाराची लाच घेताना झाली होती कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जून २०२६
मुंबई, – खार पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बसवराज स्वामीनाथ धमगुंडे यांच्यावर पोलीस सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पासपोर्टसाठी एका व्यक्तीकडे दोन हजाराची लाचेची मागणी करुन एक हजार रुपयांची लाच घेताना बसवराज धमगुंडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
बसवराज धमगुंडे हे खार पोलीस ठाण्यात पासपोर्ट विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. मे महिन्यांत त्यांच्याकडे सुनिल शिंदे हे त्यांच्या मुलीच्या पासपोर्टसंदर्भात भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे मुलीच्या पासपोर्टसाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बसवराज धमगुंडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी करुन एक हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर या पथकाने खाजगी व्यक्ती संजीतकुमार याला तक्रारदार सुनिल शिंदे यांच्याकडून एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
संजीतकुमारने ही लाच बसवराज धमगुंडे यांच्या सांगण्यावरुन घेतल्याची कबुली दिली होती. त्यानंतर याच गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. यापूर्वीही मार्च महिन्यांत खार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार तात्यासाहेब काळे यांना दिड लाखांची लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर १८ मे २०२६ रोजी बसवराज धमगुंडे याला एक हजाराची लाचप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.
या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत त्यांच्यावर पोलीस सेवेतून निलंबनाची कारवाई केली होती. या निलंबनाचे आदेश बसवराज धमगुंडे यांनी २२ मे रोजी स्विकारले आहेत. दरम्यान त्यांची विभागीय चौकशी सुरु असून या चौकशीत ते दोषी आढल्यास त्यांना बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.