मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जून २०२६
मुंबई, – ग्रॅटरोड येथील एका कुंटनखान्यात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा डी. बी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी कुंटनखान्याच्या चालकासह दोघांना पोलिसांनी अटक केली तर पाच महिलांची सुटका केली. प्रकाश नारायण राणा आणि दिपककुमार ब्रम्हदेव यादव अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान या गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची नावे सतीश शेट्टी, जितेंद्र यादव आणि मनोज यादव अशी आहेत. घटनास्थळाहून पोलिसांनी दोन मोबाईल, गांजा, कॅशसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान सुटका केलेल्या पाचही महिलांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत विविध आमिष दाखवून तरुणीसह महिलांना मुंबईत आणून त्यांना वेगवेगळ्या कुंटनखान्यात डांबून, त्यांना जबदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा कुंटनखान्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गेल्या काही वर्षांत अशा अनेक कुंटनखान्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत अनेक तरुणीसह महिलांची सुटका करुन दोषीवर कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई सुरु असताना काही ठिकाणी अजूनही काही कुंटनखान्यात सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे अशा कुंटनखान्याची पोलिसांकडून माहिती काढली जात होती.
ही कारवाई सुरु असतानाच ग्रॅटरोड येथील व्ही. पी रोड, नूर मोहम्मद इमारतीमध्ये काही महिलांना डांबून ठेवून त्यांना जबदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती डी. बी मार्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाना तिथे पाठविले होते. ठरल्याप्रमाणे रविवारी ३१ मेला बोगस ग्राहक नूर मोहम्मद इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक पंधरामध्ये गेले होते. यावेळी त्याला तिथे काही महिलांना डांबून ठेवून कुंटनखाना सुरु असल्याचे दिसून आले होते.
या ग्राहकाकडून इशारा प्राप्त होताच पोलीस निरीक्षक सागर टिळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक् सुमेश पवार, पोलीस उपनिरीक्षक कितुरे, पोलीस शिपाई विकास गिते, गलांडे, कोरके, महिला पोलीस शिपाई हिरे व अन्य पोलीस पथकाने तिथे छापा टाकला होता. यावेळी तिथे असलेल्या प्रकाश राणा आणि दिपककुमार यादव या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत प्रकाश हा नालासोपारा येथे राहत असून त्याने नूर मोहम्मद इमारतीमध्ये कुंटनखाना सुरु केल्याचे उघडकीस आले.
दिपककुमार हा झारखंडचा रहिवाशी असून तो प्रकाशला मदतनीस म्हणून काम पाहत होता. घटनास्थळाहून पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली. त्यात सर्वजणी कोलकाता आणि आसामच्या रहिवाशी आहेत. त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून मुंबईत आणून कुटनखान्यात वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. विविध ग्राहकांसोबत त्यांना शारीरिक संबंधासाठी पाठविले होते. त्यासाठी त्यांना ५० टक्के रक्कम दिल्यानंतर उर्वरित रक्कम सतीश शेट्टी, मनोज यादव, जितेंद्र यादव यांच्यासह इतर घेत होते.
या पाचही महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी विकास गिते यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर प्रकाश राणा आणि दिपककुमार यादव या दोघांना पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर या दोघांनाही माझगाव येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सतीश शेट्टी, जितेंद्र यादव आणि मनोज यादव या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसंाकडून शोध सुरु आहे.