अल्पवयीन मुलीशी बालविवाह करुन शारीरिक-मानसिक शोषण

एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तर पतीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जून २०२६
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी बालविवाह करुन तिचा मानसिक व शारीरिक शोषण केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत पिडीत मुलीच्या २६ वर्षांच्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली तर सासू-सासरे या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या तिघांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो, बालविवाह कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर आरोपी पतीला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत मुलगी अल्पवयीन असून ती गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहते. अटक आरोपी तिचा पती आणि पाहिजे आरोपी तिचे सासू-सासरे आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना त्यांनी तिचे लग्न त्यांच्या आरोपी मुलाशी लावून दिले होते. लग्नानंतर आरोपीने पिडीत मुलीवर तिच्या मनाविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. घरगुती कारणावरुन तिचा पतीसह सासू-सासर्‍याकडून मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. त्याला ती प्रचंड कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

दोन दिवसांपूर्वी तिने घडलेला प्रकार शिवाजीनगर पोलिसांना सांगून तिच्या सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत पिडीत मुलीच्या पतीसह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पोक्सो आणि बालविवाह कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पतीला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. आरोपी सासू-सासर्‍यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page