दिवंगत पोलीस अधिकार्याच्या पत्नीला गंडा घालणार्या ठगाला अटक
दहा टक्के कोट्यातून फ्लॅट देतो सांगून 50 लाखांची फसवणुक
अरुण सावरटकर
9 जून 2026
मुंबई, – दहा टक्के मंत्री कोट्यातून म्हाडाचा फ्लॅट देतो असे सांगून एका दिवंगत पोलीस अधिकार्याच्या पत्नीची सुमारे 50 लाखांची फसवणुक करणार्या ठगाला चारकोप पोलिसांनी अटक केली. बंटी ऊर्फ किरण दिपक महाडिक असे या ठगाचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अखेर त्याला एक वर्षांनी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
अपर्णा अरुण पाटील ही 58 वर्षांची महिला कांदिवलीतील चारकोप परिसरात राहते. तिचे पती अरुण महादेव पाटील हे मुंबई पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून 31 ऑक्टोंबर 2017 रोजी निवृत्त झाले होते. लिव्हरच्या कॅन्सरमुळे त्यांचे 24 मार्च 2024 रोजी निधन झाले होते. अरुण पाटील यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर बोरिवलीतील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तिथे तिची किरण महाडिकशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर तो तिला नेहमीच धीर देत होता, चांगल्या हॉस्पिटलला उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन देत होता. त्यांच्यात चांगले कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते.
पतीच्या निधनानंतर तो पाटील कुटुंबियांची विचारपूस करत होता. मुंबई शहरात स्वतचे घर नसल्याने त्याने तिला म्हाडाच्या दहा टक्के मंत्री कोट्यातून घर देण्याचे आमिष दाखविले होते. त्याच्यावर बोलण्यावर तिने विश्वास ठेवून त्याला घरासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. याच दरम्यान त्याने मंदा बोरकर या महिलेविषयी तिला सांगितले होते. मंदाचे काही राजकीय नेत्यांसह म्हाडाचे आयएएस अधिकारी जैस्वाल यांच्याशी चांगले संबंध आहे. काही दिवसांनी त्याने अपर्णा पाटील हिला गोराईतील चिकूवाडी, टाटा स्टार मॉलजवळील पार्श्वनाथ इमारतीमधील एक फ्लॅट दाखविला होता.
या इमारतीमध्ये म्हाडाचे पाच फ्लॅट असून त्यातील एक फ्लॅट तिला 72 लाखांना मिळवून देतो असे सांगितले. त्यामुळे तिने त्याला फ्लॅटसाठी टप्याटप्याने 50 लाख रुपये दिले होते. त्यासाठी अपर्णा पाटील हिने स्वतचे दागिने विक्री केले होते, नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले होते. उर्वरित कर्ज घेऊन फ्लॅटचे पेमेंट करते असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने म्हाडाचा फ्लॅटचा ताबा तसेच फ्लॅटचे कागदपत्रे दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगत होता. अचानक फ्लॅटची किंमत वाढली असून तिला आणखीन पैसे देण्यास सांगत होता.
फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने तिने हा व्यवहार रद्द करुन त्याच्याकडून पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे दिले नाही. काही दिवसांनी तो पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच अपर्णा पाटील हिने चारकोप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून किरण महाडिक ऊर्फ बंटीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध एप्रिल 2025 रोजी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या बंटी ऊर्फ किरण महाडिक याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच ही फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.