मुख्यमंत्री, महापौर कार्यालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीने खळबळ
धमकीचा मेल पाठविणार्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जून २०२६
मुंबई, – नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालयासह मुख्यमंत्री, मुंबई आणि पुण्यातील महापौरांच्या कार्यालय तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेज आदी ठिकाण बॉम्बने उडविण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने मेलद्वारे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रमुख ठिकाणावरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान या धमकीची गृहविभागाने गंभीर दखल घेत संबंधित पोलीस प्रमुखांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर धमकीचा मेल पाठविणार्या अज्ञात व्यक्तीच्या अटकेसाठी मुंबईसह पुणे आणि नागपूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या काही वर्षांत फोनसह मेलवरुन अनेकदा धमकीचे सत्र सुरु आहे. शहरातील प्रमुख शासकीय इमारतीसह मंदिर, शाळा-कॉलेज आणि महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे मेल पाठविले जात होते, मात्र संबंधित परिसराची संपूर्ण तपासणी केल्यानंतर धमकीचा कॉल अथवा मेल बोगस असल्याचे उघडकीस आले होते. धमकीचे ते सत्र काही दिवस थंडावले होते, मात्र नागपूरच्या महापौर निता ठाकरे यांना बुधवारी पहिला धमकीचा मेल प्राप्त झाला होता. या मेलमध्ये अज्ञात व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग, डॉ. हेगडेवार स्मृती भवनात बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. या धमकीनंतर नागपूर पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकासह तिथे धाव घेतली होती. या संपूर्ण मुख्यालयाची श्वान पथकाच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली, मात्र ती धमकी बोगस असल्याचे उघडकीस आले. या धमकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
ही धमकी ताजी असताना दुसरा धमकीचा मेल मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत मेल आयडीवर आला होता. अज्ञात व्यक्तीने महापौरासह मुख्यमंत्री कार्यालयासह नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर दोन्ही ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली होती. मात्र तिथे पोलिसांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. ही धमकीदेखील अफवा असल्याचे उघडकीस आले. या धमकीमध्ये खलिस्तानचा उल्लेख करण्यात आला आहे. धमकीच्या मेलमध्ये खलिस्तान नॅशनल आर्मी असे नाव देण्यात आले आहे. १९८४ साली ऑपरेशन ब्लूस्टार आणि ऑपरेशन बुडरोझला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दिला होता. त्याचाच उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपाचा सूड घेण्यासाठी धमकी पाठविण्यात आल्याचे बोलले जाते. या व्यक्तींनी मुंबईसह पुणे आणि नागपूर येथे बॉम्बच्या धमकीचे मेल पाठवून दहशतीचे वातावरण निर्माण जात आहे.
विशेष म्हणजेच ते सर्व धमकीचे मेल एका आशयाचे आहे. त्यात दुपारी एक वाजून अकरा मिनिटांनी मुंबईच्या महापौरच्या कार्यालय आयईडी बॉम्बने उडवून देण्यात येणार असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मुख्यमंत्री कार्यालयांना अशाच प्रकारे धमकीचा मेल प्राप्त झाला होता. याच दरम्यान पुण्यातील महापौरांना त्यांचे कार्यालय उडविण्याची धमकी आली होती. एकाच वेळेच या सर्व आस्थापनाना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे मेल पाठविण्यात आल होते, मात्र संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर बॉम्बची अफवा असल्याचे उघड झाले होते. या धमकीमुळे पोलिसांची चांगली दमछाक झाली हेती.
या धमकीची गृहविभागाने गंभीर दखल घेत संबंधित पोलीस प्रमुखांना तपासाचे आदेश दिले आहे. त्यामुळे धमकी देणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, राज्य एटीएस आणि सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरु आहे. धमकीवा मेल पाठविणार्या आरोपीला लवकरच गजाआड केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान धमकी मिळालेल्या आस्थानावरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आले असून तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ही धमकी कोणी दिली, धमकी देण्यामागे त्यांचा काय उद्देश आहे. याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. मुंबईकरांनी सावधगिरी बाळगा, संशयित वस्तूंना हात लावू नये. या वस्तूची मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमसह स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी. पोलिसांना सहकार्य करावे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्वांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.