म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने टेक्निशियनची फसवणुक
२९ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी रियल इस्टेटविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जून २०२६
मुंबई, – दादरच्या नायगाव परिसरात मिल कामगारांसाठी असलेल्या म्हाडा वसातीत स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका टेिक्निशियनची २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणुक झाली आहे. याप्रकरणी अनिल अरुण माने या रियल इस्टेटविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
यातील तक्रारदार नालासोपारा येथील रहिवाशी असून एका खाजगी कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करतात. कामानिमित्त त्यांना नेहमी नवी मुंबई ते नालासोपारा असा प्रवास करावा लागत होता. घरातून नोकरीचे ठिकाण लांब असल्याने ते कामाच्या जवळच एका फ्लॅटचा शोध घेत होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या नालासोपारा येथील फ्लॅटची २६ लाखांना विक्री केली होती. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राला दादर येथील नायगाव परिसरात मिल कामगाराची एक म्हाडाची रुम मिळाली होती. त्याने त्यांना अनिल माने याचा मोबाईल क्रमांक दिला होता. तो त्यांना म्हाडाची रुम स्वस्तात मिळवून देईल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी अनिलला कॉल करुन त्यांच्या घराविषयी चर्चा केली होती. त्याने त्यांना नायगावच्या म्हाडा कॉलनी, बॉम्बे डाईंग मिल इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
इतकेच नव्हे तर त्याने त्यांना इमारत तीनमधील एक रुम दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. चर्चेअंती त्यांच्यात रुमची किंमत ४२ लाख ५० हजार रुपये ठरली होती. त्यापैकी त्यांनी अनिलला २९ लाख ५० हजार रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांच्या इमारत क्रमांक तीन, १६०१ क्रमांकाच्या रुमचे नोटरीकृत एमओयू बनविण्यात आले होते. यावेळी त्याने त्यांना तीन महिन्यांत रुमचा ताबा देण्याचा तसेच ताबा दिला नाहीतर व्याजासहीत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र सहा महिने उलटूनही त्याने त्यांना रुमचा ताबा किंवा रुमचे कागदपत्रे दिली नाही. रजिस्ट्रेशनची तारीख देऊन रुमचे रजिस्ट्रेशन केले नाही. त्याच्याकडून रुमचा ताबा देण्यास उशिर होत असल्याने त्यांनी त्याच्याकडे रुमसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अनिल मानेविरुद्ध भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अनिलने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.