गोंधळ घालणार्या मुलांना समज दिली म्हणून महिलेवर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत तिघांना व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जून २०२६
मुंबई, -गोंधळ घालणार्या मुलांना समज दिली म्हणून रागाच्या भरात धनलक्ष्मी सरवनन ऊर्फ कार्तिक नाडर या २५ वर्षांच्या महिलेवर तिघांनी बांबूसह चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या धनलक्ष्मीवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही मारेकर्यांना वडाळा टी पोलिसांनी अटक केली आहे. सचिन आनंद देवेंद्र, सतीश देवेंद्र आणि शक्ती देवेंद्र अशी या तिघांची नावे असून ते तिघेही सायन कोळीवाडा व वडाळ्यातील डुक्कर गल्लीतील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता वडाळ्यातील ऍण्टॉप हिल, म्हाडा सी/३ इमारतीजवळ घडली. याच परिसरातील शुक्ला हॉटेल, पंचवटी बेकरीजवळील गल्लीत धनलक्ष्मी ही राहते. सोमवारी रात्री उशिरा काही मुले परिसरात खेळत असताना प्रचंड गोंधळ घालत होते. त्यामुळे धनलक्ष्मीचा पती सरवनन कार्तिक याने त्यांना समज देऊन गोंधळ न घालण्यास सांगितले होते. त्यानंतर ते सर्व मुले तेथून निघून गेले. लहान मुलांना धमकावून समज दिल्याच्या रागातून सचिन, सतीश आणि शक्ती हे तिघेही तिच्या घराजवळ आले.
याच कारणावरुन त्यांनी धनलक्ष्मीशी वाद घालण्याचा प्रयत्न केल. यावेळी त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचबाची झाली होती. रागाच्या भरात या तिघांनी तिच्यावर बांबूसह चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. चाकू हल्ल्याने तिच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर ते तिघेही तेथून पळून गेले होते. रक्तबंबाळ झालेल्या धनलक्ष्मीला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. ही माहिती प्राप्त होताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी धनलक्ष्मीच्या जबानीवरुन तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना मंगळवारी रात्री सचिन देवेंद्र, सतीश देवेंद्र आणि शक्ती देवेंद्र या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.