ड्रग्ज देऊन पंधरा वर्षांच्या मैत्रिणीवर मित्राकडून लैगिंक अत्याचार
२० वर्षांच्या मित्राला लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ जून २०२६
मुंबई, – केसांना लावण्यासाठी क्लिप आणण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मैत्रिणीला तिच्याच मित्राने एमडी ड्रग्ज देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार धारावी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरुन धारावी पोलिसांनी आरोपी मित्राविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत मित्राला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रग्जच्या नशेत घरी आलेल्या पिडीत मुलीच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस येताच तिच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
ही घटना सोमवारी रात्री उशिरा धारावी परिसरात घडली. २५ वर्षांची तक्रारदार तरुणी ही धारावी परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. पिडीत ही तिची लहान बहिण असून ती सध्या शिक्षण घेते. याच परिसरात २० वर्षांचा आरोपी राहत असून तो तिच्या अल्पवयीन बहिणीचा चांगला मित्र आहे. सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता ती दुकानात केसांना लावण्यासाठी लागणारा क्लिप आणण्यासाठी गेली होती. यावेळी तिला आरोपी भेटला. त्याने तिला एमडी ड्रग्ज दिले होते. त्यात तिला नशा आली होती, त्याचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्यावर एका रुममध्ये लैगिंक अत्याचार केला होता.
दुकानात गेलेली बहिण बराच वेळ होऊ घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या बहिणीने तिचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रात्री उशिरा ड्रग्जच्या नशेत ती घरी आली. याबाबत तिची चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगून तिच्या बहिणीला सांगितला. या माहितीनंतर तिने धारावी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला त्याच्या राहत्या घराजवळ मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला नंतर मेडीकलसाठी सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे तिची मेडीकल करण्यात आली आहे. ड्रग्ज देऊन आरोपी मित्राने अल्पवयीन मैत्रिणीवर लैगिंक अत्याचार केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.