पाच वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा पर्दाफाश करुन चारही आरोपींना अटक

आर्थिक वादातून अपघात दाखवून मित्राची हत्या केल्याची कबुली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ जून २०२६
मुंबई, – पाच वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये झालेल्या हत्येचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आहे. याच गुन्ह्यांत चारही मारेकर्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज नारायण भंडगे, सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर, आतिष भगवान मोरे आणि ऋतुराज शेट्टी अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर चारही आरोपींना पुढील कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या चौघांनी आर्थिक वादातून त्यांच्याच मित्र अश्पाक मुलानी ऊर्फ निहाल याची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करताना तो अपघात असल्याचे दिखावा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत अमीत राऊत आणि मनोज भंडारी या दोघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

अश्पाक मुलानी हा मूळचा सोलापूरच्या माळशिरस परिसरात राहत होता. सहाही आरोपी त्याचे परिचित असून ते चांगले मित्र होते. पाच वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग येथील कुडाळ परिसरात अश्पाकचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या मित्रांच्या जबानीनंतर कणकवली पोलिसांनी अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला होता. तपासात तो अपघात असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास बंद केला होता. पाच वर्षांनंतर या गुन्ह्यांत अश्पाक मुलानी याचा अपघात झाला नसून त्याची त्याच्याच काही मित्रांनी हत्या केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्याची शहानिशा केली होती. त्यात अश्पाक याचे आरोपीसोबत आर्थिक वाद सुरु असल्याचे उघडकीस आले होते.

याच वादातून या आरोपींनी त्याला सिंधुदुर्गच्या कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते.तिथे त्यांनी त्यांनी अश्पाक मुलानी याला बेदम मारहाण केली होती. त्याची करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना बनविली होती. त्याची हत्या नसून अपघात असल्याचा दिखावा करण्यासाठी या आरोपींनी त्याचा मृतदेह बाईकसह फोंडा घाटातील खोल दरीमध्ये फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच अश्पाकच्या मित्रांची माहिती काढून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे, धनाजी साठे, महेश शेलार, स्वप्निल काळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे, पोलीस उपनिरीक्षक परबळकर, अरुण सावंत व अन्य पोलीस पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना मनोज भंडगे, सुरेंद्र सोनवडेकर, आतिष मोरे आणि ऋतुराज शेट्टी या चौघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी अश्पाकची हत्या करुन त्याचा अपघात दाखवून हत्येचा पुरावा नष्ट केल्याची कबुली दिली. याकामी त्यांना अमीत राऊत आणि मनोज भंडारी या दोघांनी मदत केली होती. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आरोपींच्या चौकशीतून हत्येचा पर्दाफाश होताच चौघांनाही नंतर कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page