बँकेच्या निवृत्त अधिकार्याची फसवणुक करणार्या आरोपीस अटक
शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने ५४ लाखांना घातला गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ जून २०२६
मुंबई, – एका नामांकित बँकेतून निवृत्त झालेल्या ६६ वर्षांच्या बॅक अधिकार्याची फसवणुक केल्याप्रकरणी जितेंद्र अनिलकुमार दुबे या आरोपीस उत्तर सायबर सेल पोलिसांनी अटक केली. शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून आरोपींनी सुमारे ५४ लाखांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना बँकेत खाते उघडून दिले होते, याच बँक खात्यात विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम जमा झाले होते. पोलीस कोठडीनंतर जितेंद्र दुबेला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विजय सखाराम चव्हाण हे कांदिवलीतील समतानगर परिसरात राहतात. २०१२ रोजी ते एका नामांकित बँकेतून निवृत्त झाले होते. फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचा मोबाईल क्रमांक सेन्सेंस व्हिझन १६ च्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. हा ग्रुप ओपन केल्यानंतर त्यांना गु्रपमध्ये दोनशेहून अधिक सभासद असल्याचे दिसून आले. डॉ. राजीव सिंग हे ऍडमीन म्हणून काम पाहत तर इतर आरोपी त्यांचे सहाय्यक म्हणून काम करत होते. त्याने त्याची ओळख गुंतवणुक सल्लागार म्हणून करुन दिली होती. त्यांनी शेअरसह आयपीओमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
ग्रुपमधील अनेकांना शेअरसह आयपीओमध्ये चांगला फायदा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येत होते. त्यामुळे त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांना वेबसाईटवर एक ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यास सांगण्यात आले होते, ते अकाऊंट उघडल्यानंतर या अकाऊंटच्या माध्यातून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. यावेळी राजीव सिंग, खुशी गोयल यांनी त्यांना कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल यासाठी मदत केली होती. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी फेब्रुवारी ते मार्च २०२६ या कालावधीत विविध शेअरमध्ये ५४ लाख ४० हजाराच्या शेअरमध्ये गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना ५० लाखांचा प्रॉफिट झाला होता. त्यांच्या अकाऊंटमध्ये ती रक्कम दिसत होती. त्यामुळे त्यांनी त्यातील काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ती रक्कम काढता येत नव्हती. ही रक्कम काढण्यासाठी त्यांच्याकडे राजीव आणि खुशी हे चार्जेस जमा करावे लागतील, ही रक्कम जमा केल्याशिवाय त्यांना ती रक्कम काढता येणार नाही असे सांगत होते. मात्र त्यांनी स्वतची रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त रक्कम जमा करण्यास नकार दिला होता, त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधणे बंद केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तीन सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढताना पोलिसांना जितेंद्र दुबे याचे नाव समोर आले होते.
त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना बँक खाती पुरविले होते. त्याने उघडलेल्या बँक खात्यात विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम जमा झाली होती. ही रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून दिली जात होती. तपासात हा प्रकार उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती.