लग्न जुळविणार्‍या संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरुणीला गंडा

अकरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी ठगाला आठ महिन्यांनी अटक

0

अरुण सावरटकर
१४ जून २०२६
मुंबई, – लग्नाच्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरुणीशी मैत्री करुन, लग्नाचे आमिष दाखवून व्यवसायात आर्थिक मदत करण्याची बतावणी करुन सुमारे अकरा लाखांच्या फसवणुकीनंतर पळून गेलेल्या एका ठगाला कुरार पोलिसांनी अटक केली. पिंटू राकेश शहा असे या आरोपी ठगाचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पिंटूने तक्रारदार तरुणीकडून सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत दोन टप्यात ही रक्कम घेऊन तिची फसवणुक केली, तसेच पैशांची मागणी केल्यानंतर तिला शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

३२ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये राहत असून सांताक्रुज येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिने लग्नासाठी एका संकेतस्थळावर स्वतची माहिती अपलोड केली होती. मार्च २०२२ रोजी तिची गोरेगाव येथील आरे कॉलनीत राहणार्‍या पिंटू शहाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्याने तिला लग्नाची घातली होती. त्याने त्याचा सर्जिकल सप्लाय ऍण्ड फार्मास्युटिल गुड्स ऍण्ड प्रोडेक्टचा स्वतचा व्यवसाय असल्याचे सांगितले.

याच व्यवसायासाठी त्याला आर्थिक मदत हवी होती, त्यामुळे त्याने तिच्याकडे अकरा लाखांची मागणी केली होती. तिनेही त्याला दोन टप्यात अकरा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी सुुरुवातीला पाच लाख पन्नास हजार रुपये आणि नंतर पुन्हा तिने त्याला पाच लाख चाळीस हजार रुपये तिने त्याला दिले होते. ही रक्कम तीन टक्के व्याजासहीत देण्याचे पिंटूने तिला आश्‍वासन दिले होते. याच दरम्यान त्याने काही रक्कम तिच्या बँक खात्यात पाठविल्याचे तिला स्टेटमेंट दिले होते. त्याच्यावर विश्‍वास असल्याने तिने बँकेत जाऊन त्याची शहानिशा केली नव्हती.

काही दिवसांनी तिने बँक खात्याची पाहणी केल्यानंतर त्यात तिला तिच्या बँक स्टेटमेंटमध्ये तफावत असल्याचे दिसून आले. ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी पिंटूने तिच्या बँक खात्यात काही रक्कम पाठविल्याचे स्टेटमेंट दिले होते, मात्र त्याने दिलेले बँक स्टेटमेंट बोगस होते. त्याने तिला ५३ हजार ६५७ रुपये पाठविले होते. मात्र स्टेटमेंटमध्ये पाच अंकी पुढे वाढवून त्याने तिला ५ लाख ५३ हजार ६५७ रुपये पाठविल्याचा दावा केला होता. बोगस स्टेटमेंट दाखवून त्याने तिच्याकडून दुसर्‍या टप्यातील रक्कम घेतली होती.

हा प्रकार लक्षात येताच तिने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र तो तिला वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. दोन महिन्यांत तीन टक्के व्याजदराने मूळ रक्कम देण्याचे आश्‍वासन देऊन त्याने तिला पैसे परत केले नाही. तिने दिलेली रक्कम शेअरमध्ये गुंतवणुक केली असून त्यातून तो तिला पैसे देणार असल्याचे सांगत होता. मात्र त्याने पैसे दिले नाही, उलट पैशांची मागणी केल्यानंतर तो तिला बघुन घेण्याची धमकी देऊ लागला.

लग्नाच्या आमिषाने, व्यवसायात आर्थिक मदतीच्या नावाने पिंटू शहाने तिची सुमारे अकरा लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने कुरार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पिंटूविरुद्ध पोलिसांनी बोगस बँकेचे स्टेटमेंट बनवून तक्रारदार तरुणीच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.

ही शोधमोहीम सुरु असतानाच गेल्या आठ महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या पिंटू शहा याला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पिंटूने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page