फसवणुकीसह हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपींना अटक
जामिनावर बाहेर येताच दोन्ही आरोपी पळून गेल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जून २०२६
मुंबई, – फसवणुकीसह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड आरोपींना कफ परेड आणि सांताक्रुज पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. कासिम अश्रफअली चौधरी आणि सलीम मोहम्मद नबी शेख ऊर्फ पप्पू अशी या दोघांची नावे आहेत. जामिनावर बाहेर येताच ते दोघेही पळून गेले होते. अखेर या दोघांनाही फेरअटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
कासिम चौधरी हा उत्तरप्रदेशच्या मुझ्झफरनगर, हासुलीचा रहिवाशी असून काही वर्षापूर्वी तो कफ परेड परिसरात राहत होता. २०१७ साली त्याच्याविरुद्ध कफ परेड पोलिसांत हत्येचा प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या कासिमला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत न्यायायीन कोठडीत असताना त्याने त्याच्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला कोर्टाने जामिन मंजूर केला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. गेल्य नऊ वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट बजाविले होते. तसेच त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश कफ परेड पोलिसांना दिल होते.
या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक विकास कदम, पोलीस हवालदार कविता महापुरे, पोलीस शिपाई तानाजी महिपाल आणि संदेश बनसोडे यांनी त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो उत्तरप्रदेशात त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलिसांची संबंधित टिम तिथे गेली होती. यावेळी कासिम हा गुजरात येथील दहेज परिसरात ानोकरी करत असलचे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर या पथकाने तिथे साध्य वेशात पाळत ठेवून कासिमला ताब्यात घेतले. तपासात तो तिथे रोजदांरीवर काम करत होता. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यत आले होते. त्याला लोकल कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दुसर्य घटने सलीम मोहम्मद नबी शेख याला पोलिसांनी अटक केली. तो चुनाभट्टी येथील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहत होता. २००३ साली त्याच्याविरुद्ध सांताक्रुज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याला वांद्रे कोर्टाने जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस तो सतत गैरहजर राहत होता. गेल्या काही वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेत त्याव्याविरुद्ध गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत जाहीरनामा जारी केला होता. त्यानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना तो चुनाभट्टी परिसरात स्वतचे अस्तिस्त बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक विजय खंडागळे, सहाय्यक फौजदार आव्हाड, पोलीस हवालदार अजय गोडसे, पोलीस शिपाई प्रशांत मखरे यांनी चुनाभट्टी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून सलीम शेखला अटक केली. चौकशीत तोच जाहीरनामा जारी केलेला फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर त्याला पोलीस बंदोबस्तात वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.