विक्रोळीतीतील अपघातात २५ वर्षांचा तरुणाचा मृत्यू तर मित्र जखमी
अपघातानंतर आरोपी वाहनचालकाचे घटनास्थळाहून पलायन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जून २०२६
मुंबई, – विक्रोळीतील अपघातात एका २५ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीररीत्या जखमी झाला. मृत तरुणाचे शहाबुद्दीन नौशाद खान तर जखमी तरुणाचे नाव हकीक सईद खान असून हकीकवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध सुरु केला आहे.
हा अपघात गुरुवारी रात्री उशिरा दिड वाजता नाहूर येथील पूर्व दुतग्रती महामार्गावरील दक्षिण वाहिनीवर झाला. अजमल अक्रम खान हा व्यवसायाने कारपेंटर असून रायगडच्या पेणमध्ये राहतो. मृत शहाबुद्दीन हा त्याचा आतेभाऊ आहे. गुरुवारी रात्री उशिरा शहाबुद्दीन हा त्याचा मित्र हकीक खान याचसोबत मुंब्रा येथून वांद्रेच्या दिशेने जात होते. रात्री दिड वाजता त्याची बाईक् पूर्व दुतग्रती महामार्गावरील दक्षिण वाहिनीवरुन जात होती. यावेळी भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या बाईकला धडक दिली होती.
या अपघातात शहाबुद्दीन व तयाचा मागे बसलेला हकीक हे दोघेही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी दोघांनाही पोलिसांनी जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर सायन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता शहाबुद्दीनचा मृत्यू झाला तर हकीकवर उपचार सुरु आहे.
याप्रकणी अजमल खानच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर दुसर्याला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर आरोपी वाहनचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.