महानगरपालिकेत उपायुक्त असल्याची बतावणी करुन फसवणुक
मालाड येथून तोतया पालिका उपायुक्ताला बोगस दस्तावेजासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जून २०२६
मुंबई, – मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त दर्जाचा अधिकारी असल्याची बतावणी करुन अनेकांना गंडा घालणार्या एका तोतया पालिका उपायुक्ताला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी बेड्या ठोकल्या. अल्ताफ शेख असे या ४५ वर्षांच्या तोतयाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक होडा सिटी कारसह मोठ्या प्रमाणात विविध शासकीय विभागाचे व्हिजीटिंग कार्डसह इतर दस्तावेज जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला बुधवारी सायंकाळी किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
एक संशयित व्यक्ती स्वतला मंत्रालयासह मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त पदावर काम करत असल्याची बतावणी करुन महानगरपालिकेत काहीही काम असल्यास किंवा काही दस्तावेज हवे असल्यास त्यांना मिळवून देतो. याकामी तो संबंधित व्यक्तीकडून पैसे उकाळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना प्राप्त झाली होती. या माहितीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागासह युनिट तीनच्या अधिकार्यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे, प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काटे, पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे, रोहित बंडगर, पोलीस हवालदार बंगाले, गावकर यांनी संबंधित व्यक्तीची जास्तीत जास्त मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला होता.
ही माहिती काढत असताना संबंधित व्यक्ती मालाड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने मालाडच्या दत्त मंदिर रोड, पुष्पा पार्क मार्ग क्रमांक तीन, प्रितम हॉटेलजवळ साध्या वेशात पाळत ठेवून अल्ताफ शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी विविध शासकीय विभागाचे व्हिजीटिंग कार्ड, नियुक्तीपत्र, विविध शासकीय यंत्रणा आणि व्यक्ती यांनी दिलेले ऑथोरायझेशन लेटर, शासकीय विभागाचे लेटरहेड, भारतीय राजमुद्रा, प्रेसचे एक बूम, गर्व्हरमेंट ऑफ इंडिया असे लिहिलेले स्टिकर्स आणि इतर शसकीय संस्थांची बोगस कागदपत्रे सापडले. संबंधित सर्व दस्तावेज त्याने स्वतहून बनविले होते.
तो एका होंडा सिटीकारमध्ये येऊन लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत होता. या कारवर त्याने अंबर दिवा लावला होता. ही कारदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या कारमधून संबंधित व्यक्तींना भेटल्यानंतर तो त्यांचा स्वतचा प्रभाव पाडत होता. त्याला पाहिल्यानंतर अनेकांना तो मंत्रालयासह महानगरपालिकेत कामाला असल्याचे वाटत होते. त्याच्याविरुद्ध दिडोंशी पोलीस ठाण्यात तोतयागिरी करुन फसवणुक करणे, बोगस दस्तावेज बनविणे आदी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडे सोपविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली होती.
प्राथमिक तपासात अल्ताफ हा अनेकांना मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त दर्जाचा अधिकारी असल्याची बतावणी करत होता. सध्या त्याची पोस्टिंग मंत्रालयात आहे. त्यामुळे मंत्रालयासह पालिकामध्ये काहीही काम असल्याचे करुन देतो, महत्त्वाचे कागदत्रे मिळवून देतो असे सांगून लोकांकडे पैशांची मागणी करत होता. गेल्या सहा वर्षांपासून तो सक्रिय होता. अलीकडेच एका व्यक्तीकडून त्याने दहा हजार रुपये घेतले होते. त्याने अशाच प्रकारे काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याच्याकडून फसवणुक झालेल्या व्यक्तींनी गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी केले आहे.
या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत करत होते का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. अटक केल्यानंतर त्याला सायंकाळी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.