लोकलमध्ये २२ वर्षांच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपीला नवी मुंबईतून अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जून २०२६
मुंबई, – उपनगरीय लोकलच्या मालाड-गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा एका २२ वर्षांच्या तरुणाची त्याच्सोबत प्रवास करणार्या सहप्रवाशाने चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मयंक रमेश लोहार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या रोशन सुवर्णा नावाच्या ३० वर्षांच्या आरोपीला नवी मुंबईतून रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यांतील चाकू हस्तगत केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. क्षुल्लक वादातून ही हत्या असून घटनेच्या वेळेस आरोपीने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या हत्येच्या घटनेने मुंबईकराच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही घटना मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजता गोरेगाव-मालाड रेल्वे स्थानकादरम्यान नालासोपारा येथे जाणार्या उपनगरीय फास्ट लोकलच्या मिडल फर्स्ट क्लास डब्ब्यात घडली. मयंत हा विरार येथील भोईरपाडा परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. सध्या तो अंधेरीतील एका नामांकित कपड्याच्या मॉलमध्येे सेल्समन म्हणून काम करत होता. मंगळवारी काम संपल्यानंतर तो अंधेरी रेल्वे स्थानकात आला होता. यावेळी नालासोपारा येथे जाणार्या फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये तो चढला. याच डब्ब्यात आरोपी रोशन हादेखील प्रवास करत होता. ही लोकल गोरेगाव-मालाड रेल्वे स्थानकादरम्यान जात असताना पावसामुळे लोकलमध्ये पाणी आत येत असल्याने त्यांच्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद झाला होता.
या वादानंतर रागाच्या भरात रोशनने मयंकला शिवीगाळ करुन त्याच्या बॅगेतून चाकू काढून त्याच्या छाती आणि पोटावर वार केले होते. या प्रकारामुळे लोकलमधील इतर प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही लोकल बोरिवली रेल्वे स्थानकात येताच रोशन हा पळून गेला होता. प्रवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या मयंकला रेल्वे पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. रोशन हा प्रचंड संतापला होता, त्याच्या हातातील चाकू पाहून कोणीही प्रवाशी मयंकच्या मदतीसाठी आला नाही.
काही प्रवाशांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला, मात्र त्याने त्यांनाच शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचे काही प्रवाशांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले. मयंकच्या मृत्यूची माहिती नंतर त्याच्या वडिलांना देण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीवरुन बोरिवली रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि आरपीएफ पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पश्चिम परिमंडळातील विविध पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि आरपीएफ पोलिसांचे सात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
या पथकाने पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. रेल्वे स्थानकासह परिसरातील चारशेहून अधिक सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने रोशन नावाच्या एका ३० वर्षांच्या संशयिताला नवी मुंबईतील पनवेल परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही हत्या केल्याची कबुली दिली. तपासात रोशन हा मिरारोड येथे राहत असून बारकोड बनविण्याचे काम करत होता. प्राथमिक तपासात घटनेच्या वेळेस रोशनने मद्यप्राशन केले होते. मयंकशी वाद झाल्यानंतर त्याने अचानक बॅगेतून चाकू काढला आणि त्याच्यावर वार केले होते. छातीला आणि पोटात गंभीर दुखापत झाल्याने मयंक हा गंभीररीत्या जखमी झाला होता, उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
हत्येनंतर रोशन हा बोरिवलीला उतरुन कुर्ला येथे गेला होता. त्यानंतर तो नवी मुंबईला पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रोशनने त्याच्यासोबत चाकू का ठेवला होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्याला गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान मंगळवारी लोकलमध्ये मयंकच्या हत्येच्या घटनेने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त सुनिता ठाकरे-साळुंके, सहाय्यक पोलीस आयुक्त मनिष रावखंडे याच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी एम. खुपरेकर, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणयचे हमराज कुंभार, डी. वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम, अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे, बोरिवली आरसीएफचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल यादव, गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक गणपत सुळे, पालघर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुंदा गावडे-डिसोझा, पोलीस उपनिरीक्षक साळुंके, जाधव, पोलीस हवालदार देवरुखकर, शेख, साठे, जाधव, नरवडे, भोजणे, गोवर्धन जाधव, पोलीस शिपाई चौधरी घुटे, कांबळे, सालकर, कोकणी, पवार, राऊत यांनी केली.