एपीके फाईलद्वारे मोबाईल हॅक करुन गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश
झारखंडच्या सहाजणांना फसवणुकीशी संबंधित मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जून २०२६
मुंबई, – आरटीओसह महानगर गॅसशी संबंधित बोगस एपीके फाईलद्वारे मोबाईल हॅक करुन अनेकांना गंडा घालणार्या एका झारखंडच्या टोळीचा पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ अस्तून अन्सारी, शेख बेलाल नौशाद, मेहबूब नौशाद आलम, साजिद मंसुरअली, मोहन कुशल महतो आणि सुनिलकुमार दशरथ सोरेन अशी या सहाजणांची नावे असून ते सर्वजण झारखंड व दिल्लीचे रहिवाशी आहेत. या कारवाईत पपोलिसांनी अकरा मोबाईल, एक लॅपटॉप, विविध आरटीओ, महानगर गॅस नावाच्या १११ एपीके फाईल, डाटाबेसमध्ये ८३ एपीकेसंबंधित पॅकेज नेमसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
यातील तक्रारदार पश्चिम उपनगरात राहत असून काही महिन्यांपूर्वी त्यांना महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून एक मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात त्याचे बिल अपडेट नसून रात्री उशिरा त्यांचे गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बिल अपडेटसाठी एपीके फाईल पाठविण्यात आली होती. ही फाईल ओपन करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला होता. याच दरम्यान अज्ञात सायबर ठगांनी त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ३५ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या काही वर्षांत आरटीओसह महानगर गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने अनेकांची फसवणुक होत होती. अज्ञात सायबर ठगांकडून बोगस एपीके फाईल संबंधित तक्रारदारांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जात होता. त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह सर्वच सायबर सेलला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गच्चे, धनवेश पाटील, विजय घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक दिपक तायडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश खुशलानी, पोलीस हवालदार प्रशांत भुवड, महेंद्र तावडे, विकास दिगे, पोलीस शिपाई संग्राम जाधव, सुयश लोकरे, अमोल फापळे, मयुर इंगळे, ओमकार शिंदे, अनिल वारे आदी पथकाने तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन बोगस एपीके डेव्हलपर, वितरीत करणारे आणि तक्रारदारांना एपीके फाईल पाठविणार्या काही आरोपींची नावे समोर आली होती. ही टोळी झारखंड, दिल्ली आणि बिहार येथून अशा प्रकारे फसवणुक करत होती. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी तिन्ही राज्यात सायबर सेलची टिम पाठविण्यात आली होती.
या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून आरिफ अन्सारी, शेख नौशाद, मेहबूब आलम, साजिद मंसुरअली, मोहन महतो आणि सुनिलकुमार सोरेन अशा सहाजणांना अटक केली. यातील साजिद हा दिल्ली तर इतर पाचही आरोपी झारखंडचे रहिवाशी आहे. या टोळीकडून पोलिसांनी अकरा मोबाईल, एक लॅपटॉप, विविध बँकेच्या आरटीओ आणि महानगर गॅसच्या नावाच्या १११ एपीके फाईल्स मिळून आल्या. तसेच त्यांच्या डाटाबेसमध्ये ८३ एपीकेसंबंधित पॅकेज नेम, व्हॉटअप, टेलिग्राम, टेलिग्राम बोट, एपीके विक्रीबाबत केलेले अनेकांशी केलेले संभाषण मिळून आले. एपीके इन्स्ट्रॉल केल्यानंतर तक्रारदाराचे मोबाईल हॅक होऊन त्यांचे मॅसेज सायबर क्रिमिनलमध्ये जात होते.
अशा प्रकारच्या गुगल फायरबेस आणि हॉस्टिंगर सर्व्हरमधून सुमारे सव्वाकोटी एसएमएस रेकॉर्ड सापडले. त्यांच्या डाटाबेसमधील बोगस एपीके फाईल इन्स्ट्रॉल करणार्या एकूण ८६०९ मोबाईल क्रमांक, त्यांच्यासंबंधित संकलित केलेली गोपनीय माहिती, बँक खाते क्रमांक, एटीएम क्रमांक, पीन क्रमांक, सीव्हीसी क्रमाक, युपीआय आदींचा समावेश आहे. गुन्ह्यांतील रिकव्हर केलेल्या डाटा आणि एनसीसीआर पोर्टलवरील तक्रारीचे विश्लेषण केल्यानंतर भारतातील विविध राज्यातून संबंधित आरोपीविरुद्ध ३२०६ हून अधिक फसवणुकीचे तक्रारी प्राप्त झाले आहे. या गुन्ह्यांत ४३ कोटी २५ लाख ७७ हजार ४९७ रुपयांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे.
या आरोपींचा ताबा घेण्यासाठी विविध राज्यातील सायबर पोलिसांसह स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. एपीके फाईल पाठवून मोबाईल हॅक करुन ऑनलाईन फसवणुक करणारी ही एक सराईत टोळीने आहे. या टोळीविरुद्ध मुंबईसह देशभरातील विविध पोलीस ठाणे, सायबर सेलमध्ये गुन्हे दाखल आहेत. तपासात आलेल्या या माहितीनंतर या सहाजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.