शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने बहिण-भावांची दहा लाखांची फसवणुक

फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपी महिलेस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जून २०२६
मुंबई, – कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास एक लाखांवर तीन महिन्यांत वीस टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका वयोवृद्ध बहिण-भावांना सुमारे दहा लाखांना गंडा घातल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपी महिलेस कांदिवली पोलिसांनी अटक केली. दिपीका मनोज शेट्टी असे या ३२ वर्षीय आरोपी महिलेचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फेब्रुवारी महिन्यांत गुन्हा दाखल होताच दिपीका ही पळून गेली होती, अखेर तिला चार महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले.

६० वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार रजनी दयानंद शेट्टी ही महिला कांदिवली परिसरात राहत असून तिचा हरिश शेट्टी चुलत भाऊ आहे. त्याचे निर्मल बंग या ब्रोकिंग एजन्सीमध्ये एक खाते असून त्याच ठिकाणी दिपीका शेट्टी ही कामाला होती. त्यातून त्यांची चांगली ओळख झाली होती. काही महिन्यांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. सप्टेंबर २०२४ रोजी कांदिवलीतील कमला विहार स्पोर्ट क्लबमध्ये रजनी आणि दिपीका यांची ओळख झाली होती. यावेळी तिने तिला निर्मल बंग या कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे तिने तिला आमिष दाखविले होते.

इतकेच नव्हे तर एक लाखांच्या गुंतवणुकीवर तिला तीन महिन्यांत वीस टक्के म्हणजे साठ हजार रुपये परतावा मिळेल असा दावा करुन तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर विश्‍वास ठेवून रजनीसह तिचा भाऊ हरिश शेट्टी यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत रजनीने नऊ तर हरिशने एक लाख रुपये असे दहा लाख रुपये दिपीका शेट्टीकडे शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी दिले होते. तीन महिन्यानंतर त्यांनी तिच्याकडे परताव्यासह मूळ रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र तिने त्यांना पैसे दिले नाही. काही दिवसांनी तिने त्यांना साडेआठ लाखांचा धनादेश दिला होता,

मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यानंतर ती विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच रजनी शेट्टीने दिपीकाविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या दहा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दिपीका पळून गेली होती. तिचा पोलिसांकडून शोध सुरु होता.

ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दिपीकाला रविवारी कांदिवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले असता तिला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दिपीकाने शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जात असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page