झटपट श्रीमंत होण्यासाठी गांजा तस्करीचा प्रयत्न महागात पडला

आबूधाबी येथून गांजा घेऊन आलेल्या प्रवाशाला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जून २०२६
मुंबई, – झटपट श्रीमत होण्यासाठी गांजा तस्करीचा प्रयत्न एका २५ वर्षांच्या तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. आबूधाबी येथे गांजा घेऊन आलेल्या या तरुण प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मोईन खान असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्या बॅगेतून या अधिकार्‍यांनी ६ किलो ८२३ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत २ कोटी ३८ लाख ८० हजार रुपये आहे. एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी रात्री उशिरा पावणेचार वाजता मोईन हा आबूधाबी येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या बॅगेत गांजा असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यामुळे विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच त्याला या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेची तपासणीदरम्यान या अधिकार्‍यांना काही पॅकेटमधून गांजा आणल्याचे दिसून आले. या पॅकेटमधून या अधिकार्‍यांनी ६८२३ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत २ कोटी ३८ लाख रुपये इतकी आहे.

तपासात तो उत्तरप्रदेशच्या मेरठ, समर गार्डन कॉलनी, लाल मशिदीजवळील परिसरात राहतो. काही दिवसांपूर्वीच तो विदेशात गेला होता. गुरुवारी आबूधाबी येथून येताना तो गांजा घेऊन आला होता. याकामी त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळणार होता. त्याला झटपट श्रीमंत व्हायचे होते, त्यासाठी गांजा तस्करीचा प्रयत्न केला होता, मात्र पहिल्याच प्रयत्नात तो पकडला गेला.

गांजासह त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत त्याला या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page