व्यवसायात झालेल्या नुकसानीनंतर कापड व्यापार्‍याची आत्महत्या

वरळी लिंकवरुन समुद्रात उडी घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जून २०२६
मुंबई, – व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे मानसिक नैराश्यात असलेल्या एका ५१ वर्षांच्या कापड व्यापार्‍याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भावेश नवीनचंद्र मजेठिया असे व्यापार्‍याचे नाव असून त्याने सकाळी वरळी लिंकवरुन समुद्रात उडी घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी वरळी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. भावेश यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांची जबानी नोंदविण्यात आली असून त्यात आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचल्याचे उघडकीस आले आहे.

भावेश मजेठिया हे ठाण्यातील श्रीनगर परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. त्यांचा घाटकोपर परिसरात स्वतचा कपड्याचा व्यवसाय होता. गेल्या सहा महिन्यांत त्यांना व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते, त्यातून ते कर्जबाजारी झाले होते. याच कारणावरुन ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यातून त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे घाटकोपर येथे जाण्यासाठी निघाले. त्यानंतर ते टॅक्सीने वांद्रे-वरळी लिंक रोडवर आले होते.

ही टॅक्सी वरळी सी लिंकवरुन जात असताना त्यांनी टॅक्सीचालकाला मळमळ होत असल्याचे टॅक्सी बाजूला घेण्याची विनंती केली. टॅक्सी थांबताच ते बाहेर उतरले आणि काही कळण्यापूर्वीच त्यांनी सी लिंकवरुन समुद्रात उडी घेतली होती. हा प्रकार टॅक्सीचालकाच्या लक्षात येताच त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. ही माहिती प्राप्त होताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी बचाव पथकाने भावेश यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या वॉलेटमध्ये मिळालेल्या कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली होती.

ही माहिती नंतर त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. प्राथमिक तपासात आर्थिक विवंचतेतून आलेल्या नैराश्यातून भावेश यांनी समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची जबानी नोंदविण्यात आली आहे. त्यांनी या घटनेला कोणालाही जबाबदार धरले नाही किंवा त्यांची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे जबानीत म्हटले आहे. या जबानीनंतर वरळी पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. भावेश यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने त्यांच्या सोसायटीमधील रहिवाशी, मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page