पावणेचार कोटी रुपयांच्या हेरॉईनसह २० वर्षांच्या तरुणाला अटक
पहिल्याच पहिल्याच प्रयत्नात पोलिसांच्या हाती सापडला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जून २०२६
मुंबई, – सुमारे पावणेचार कोटी रुपयांच्या ७५० ग्रॅम वजनाच्या हेरॉईनसह एका २० वर्षांच्या तरुणाला कांदिवली युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. सुभान इम्रान अहमद गाडा असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तराखंडचा रहिवाशी आहे. हेरॉईन तस्करीचा सुभान हा पहिलाच प्रयत्न होता, पहिल्याच प्रयत्नात तो पोलिसांच्या हाती सापडल्याचे बोलले जाते. हेरॉईन तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीतील इतर आरोपींची नावे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान अटकेनंतर सुभान गाडा याला किल्ला कोर्टाने मंगळवार ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती, त्यात काही ड्रग्ज तस्कर इतर राज्यातून ड्रग्ज आणून त्याची मुंबई शहरात विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काही तरुण इतर राज्यातून आणलेल्या हेरॉईनची विक्रीसाठी गोरेगाव परिसरात येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नाईक, उल्हास खोलम, पोलीस उपनिरीक्षक निखील शेळके, संतोष पाटील, सहाय्यक फौजदार विनोद निकम, विल्फ्रेड मचाडो, पोलीस हवालदार सुधाकर देसाई, लक्ष्मण राऊत, धनाजी बोराटे, भरत मोहिते, महेश चौधरी, अरुण राठोड, सुभाष खेमनर, पोलीस शिपाई नरेंद्र रोकडे, हनुमंत राणे, रुपम गिभल, अविनाश गालवे, राहुल वलवे, महिला पोलीस शिपाई सुदक्षिणा नेहे आदी पथकाने गोरेगाव परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
रात्री साडेदहा वाजता संबंधित पोलीस पथक गोरेगाव येथील जयचंदालाल कारवॉ मार्ग, महानगरपालिका गार्डजवळ गस्त घालत होते, यावेळी पोलिसांना एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना ७५० ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत सुमारे पावणेचार कोटी रुपये इतकी आहे. तपासात आरोपी तरुणाचे नाव सुभान गाडा असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा उत्तराखंडच्या इब्राहिमपूर, आबिदपूरचा रहिवाशी आहे. सध्या तो गोरेगाव येथील शहिद भगतसिंग नगर क्रमांक, पुजारी गल्लीत राहतो. त्याने उत्तराखंड येथून हेरॉईन आणून त्याची मुंबईत विक्रीचा प्रयत्न केला होता,मात्र पहिल्याच प्रयत्नात पोलिसांना हाती सापडला.
त्याच्याविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. प्राथमिक तपासात या गुन्ह्यांत हेरॉईन तस्करी करणार्या एका आंतरराज्य टोळीचा सहभाग उघडकीस आला असून यातील मुख्य आरोपी उत्तराखंड येथे राहणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी एक टिम लवकरच उत्तराखंड येथे जाणार आहे.