चौकशीच्या नावाने ज्वेलर्स व्यापार्याला लुटणार्या तोतया पोलिसाला अटक
साडेबारा लाखांच्या कॅशसहीत सोन्याचे तुकडे घेऊन पलायन केले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जून २०२६
मुंबई, – चौकशीच्या नावाने कारमध्ये बसवून एका ज्वेलर्स व्यापार्याला लुटणार्या एका तोतया पोलिसाला मेघवाडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. कार्तिक शेखर नाडर असे या १९ वर्षीय आरोपीचे नाव असून तो कांदिवलीतील रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचे दोन सहकारी कुंदन आणि महादेव ऊर्फ विपुल सिंग यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या तिघांनी संगनमत करुन तक्रारदार व्यापार्याकडील साडेबारा लाखांची कॅश आणि सोन्याचे तुकडे असा तेरा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
ही घटना शनिवारी २० जूनला रात्री अकरा वाजता जोगेश्वरीतील प्रेमनगर, स्मिता बार, जनशक्ती पोलीस चौकीजवळ घडली होती. खोकन निताई मंडल हे ज्वेलर्स व्यापारी आहेत. जोगेश्वरी परिसरात त्यांच्या मालकीचे एक ज्वेलर्स शॉप आहे. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्याकडे दुकानातील साडेबारा लाखांची कॅश आणि दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुकडे असा तेरा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल होता. रात्री अकरा वाजता ते स्मिता बार, जनशक्ती चौकीजवळून जात होते. याच दरम्यान तिथे तीनजण आले. त्यांनी ते तिघेही गुन्हे शाखा युनिट दहाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांना चौकशीसाठी त्यांच्यासोबत यावे लागेल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांना तिथे उभ्या असलेल्या हुंडाई कंपनीच्या ऑरा कारमध्ये बसविले. त्यानंतर ते सर्वजण कारमधून निघाले होते.
कारमध्ये त्यांनी त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून आम्ही चकमकफेम अधिकारी असल्याचे सांगून त्यांना चकमकीत ठार करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी त्यांच्याकडील कॅश आणि सोन्याचे तुकडे असलेली बॅग घेऊन पलायन केले होते. घडलेल्या प्रकाराने खोकन मंडल यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही तोतया पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मेघवाडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. यातील एका फुटेजमध्ये तिन्ही आरोपींची ओळख पटली होती. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पळून गेलेल्या कार्तिक नाडर या तरुणाला कांदिवली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने कुंदन आणि महादेव यांच्या मदतीने ही लुटमार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचे दोन्ही सहकारी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.