निवृत्त वयोवृद्ध पोलीस अधिकार्याची पोलीस पूत्राकडून फसवणुक
स्वस्तात रुमच्या बहाण्याने साडेदहा लाखांना गंडा घातल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जून २०२६
मुंबई, – सायन-ऍण्टॉप हिल परिसरात स्वस्तात रुम देण्याच्या बहाण्याने एका निवृत्त वयोवृद्ध पोलीस अधिकार्याची त्याच्याच परिचित पोलीस पूत्राने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंजिक्य जनार्दन भोकरे या पोलीस पूत्राविरुद्ध माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्याच्यावर रुमसाठी घेतलेल्या साडेदहा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. अंजिक्यकडून अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक झाली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
महादेव शिवप्पा नार्वेकर हे ६५ वर्षांचे तक्रारदार कोल्हापूरच्या गडलिंग्लज, नांगनूरचे रहिवाशी आहे. मे २०१७ साली ते मुंबई पोलीस दलातील ताडदेव येथील ल विभाग दोनमधून सहाय्यक फौजदार म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर ते गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्या गावी राहत आहेत. जानेवारी १९८३ साली पोलीस शिपाई म्हणून भरती झाल्यानंतर ते माटुंगा येथील पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. याच दरम्यान ते सायन आणि ऍण्टॉप हिल येथे घर घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना त्यांच्या बजेटमध्ये रुम मिळाला नाही. याच दरम्यान त्यांना त्यांचा पोलीस हवालदार सहकारी जनार्दन भोकरे यांने त्यांचाा मुलगा अंजिक्य भोकरेविषयी माहिती दिली होती. तो कन्स्ट्रक्टशन साईटवर काम करत असून तो त्यांना स्वस्तात रुम मिळवून देईल असे सांगितले.
अंजिक्य आणि महादेव नार्वेक्र यांचा मुलगा मिलिंद हे दोघेही चांगले मित्र होते. त्यामुळे त्यांनी मिलिंदला अंजिक्यसोबत रुम पाहण्यास सांगितले होते. मार्च २०१९ रोजी त्याने त्यांना सायन-कोळीवाडा, फायर बिग्रेडसमोरील एका चार मजली इमारतीमध्ये एक रुम दाखविला होता. तो रुम बंद होता, तिथे कोणीही राहत नव्हते. त्याची चावी अंजिक्यकडे होती, त्याने रुम दाखवून तंना तो ४७ लाखांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी त्यांनी अंजिक्यला रुममालकाला देण्यासाठी पंधरा लाख रुपये आरटीजीएस केले होते.
या पेमेंटनंतर त्याने त्यांना रुमचे कागदपत्रे देतो असे सांगितले, मात्र त्याने रुमचे कागदपत्रे दिले नाही. वारंवार मागणी करुनही त्याने रुमचे कागदपत्रे न दिल्याने त्यांनी रुमचा व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे पंधरा लाखांची मागणी सुरु केली होती. जुलै २०२२ ते मे २०२६ या कालावधीत त्याने त्यांना साडेचार लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित साडेदहा लाखांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच महादेव नार्वेकर यांनी अंजिक्य भोकरे याच्याविरुद्ध माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंजिक्य भोकरे याने रुमच्या बहाण्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.