कर्जबाजारी झाल्याने पावणेसहा लाखांच्या दागिन्यांवर हातसफाई

बॅकेच्या पासबुकवरुन चोरीचा पर्दाफाश करुन मोलकरणीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जून २०२६
मुंबई, – कर्जबाजारी झाल्याने स्वतच्या मालकीच्या घरातील ड्युब्लिकेट चावी बनवून घरात प्रवेश करुन मोलकरणीने सुमारे पावणेसहा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना अवघ्या बारा तासांत चोरीचा पर्दाफाश करुन डी. एन नगर पोलिसांनी शिला अरविंद चिबडे या ५० वर्षांच्या आरोपी मोलकरीणला अटक केली. चोरीच्या दागिन्यांवर तिने साडेपाच लाखांचे कर्ज काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कर्जाची ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाले होते, तिच्या पासबुकवर तशी नोंद होती, या नोंदीबाबत चौकशीनंतर तिने चोरीची कबुली दिली आहे. ते सोने लवकरच हस्तगत केले जाणार आहे. शिला ही सराईत गुन्हेगार असून तिच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात अशाच एका चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. शिलाच्या बँकेच्या पासबुकवरुन या चोरीचा पर्दाफाश झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांनी सांगितले.

स्वाती मधुकर पाटील ही महिला तिच्या मुलासोबत अंधेरीतील आशिष-मनिष मार्केट परिसरात राहत असून त्यांचा जुहू येथे फुल विक्रीचा व्यवसाय आहे. पूर्वी पाटील कुटुंबिय कपासवाडी, शिवाजीनगर येथे राहत होते. फेब्रुवारी २०२६ पासून ते आशिष मनिष मार्केट परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत आहे. तेव्हापासून तिच्याकडे शिला ही घरकाम करत होती. कामात हुशार असल्याने तिचा शिलावर विश्‍वास होता. २३ जूनला तिच्या बहिणीच्या मुलाचे मालाडच्या मढ जेट्टी येथे लग्न होते, त्यामुळे तिने कपाटातील सोन्याचे दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला कपाटातून काही सोन्याचे दागिने दिसून आले नाही.

तिने संपूर्ण कपाटाची पाहणी केल्यानंतर तिला एक सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या बांगड्या आणि एक नेकलेस असा पावणेसात लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. चोरीच्या या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.

आरोपीचा शोध सुरु असताना अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकिरण काशिद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस, पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, संदीप लगस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोटे, पोलीस हवालदार अंकुश गवळी, संग्राम पात्रे, महिला पोलीस हवालदार सिमा साबळे, यांनी स्वाती पाटील हिच्याकडे काम करणार्‍या शिला चिबडे या महिलेस संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

तिच्या बँक खात्यातील पासबुकची तपासणी केल्यानंतर त्यात तिने एका खाजगी कंपनीतून साडेपाच लाखांचे सोने तारण कर्ज घेतल्याचे उघडकीस आले. या कर्जाविषयी विचारणा केल्यानंतर तिनेच स्वाती पाटील हिच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याची कबुली दिली. घरकाम करताना तिने तिच्या घरातील ड्युब्लिकेट चावी बनवून घेतली होती. फेबुवारी ते जून २०२६ या कालावधीत घरात कोणीही नसताना तिने घरात प्रवेश करुन विविध सेान्याचे दागिने चोरी केले होते. तेच दागिने गहाण ठेवून तिने साडेपाच लाखांचे कर्ज घेतले होते. तिच्यावर कर्ज झाले होते, ते कर्ज फेडण्यासाठी तिने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करुन चोरीच्या दागिन्यांवर कर्ज घेतल्याचे तपासात उघडकीस आले.

तपासात तिच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात अशाच एका चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. चोरीचा गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना अवघ्या बारा तासात पोलिसांनी गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन आरोपी मोलकरणी महिलेस अटक केल्याने तपास अधिकार्‍याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page