सोन्याचा अपहार करुन फसवणुकप्रकरणी कंपनीचे मॅनेजर गजाआड
सात वर्षांत ३ कोटी ३९ कोटीच्या सोन्याचा अपहार केल्याची कबुली
अरुण सावरटकर
२८ जून २०२६
मुंबई, – अंधेरीतील सोन्याचे दागिने बनविण्याच्या कारखान्यात कोट्यवधी रुपयांच्या सोन्याचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी दोन मॅनेजरला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. जिगर महेश जगडा आणि चेतन महेश सोनी अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. या दोघांना निकेत विजय वाया आणि हरेंद्र रामचंद्र कुशवाह यांनी मदत केल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर त्यांना या गुन्ह्यांत सहआरोपी करण्यात आले होते. या चौघांवर सात वर्षांत ३९ लाख २१ लाख ६२० रुपयांचे सोन्याचे दागिन्यांचे डिझाईन विकत घेतल्याच्या बोगस पावत्या सादर करणे तसेच तीन कोटीच्या सोन्याचे मेल्टींग करताना थोडे थोडे करुन २२३५ वजनाचे सोन्याचा अपहार करणे असा ३ कोटी ३९ लाख २१ हजार ६२० रुपयांचा सोन्याचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून गुन्ह्यांतील सर्व सोने लवकरच हस्तगत केले जाणार आहे.
विकास नवरतनलाल गन्ना हे ज्वेलर्स व्यापारी असून ते वडाळा परिसरात राहतात. त्यांची बाणगंगा गोल्डन डायमंड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीचे कार्यालय अंधेरीतील मरोळ, एमआयडीसी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात आहे. या ठिकाणी विविध डिझाईनचे सोन्याचे, हिरेजडीत दागिने बनवून त्याची विक्री केली जाते. या कंपनीत जिगर जगडा, चेतन सोनी, निकेश वाया, जितेंद्र खेडेलवाल आणि मोहित सुराणा असे पाचजण मॅनेजर तर १७५ कारागिर कामाला आहे. १९९२ साली नवरतनलाल गंगा यांनी कंपनीची स्थापना केली होती. त्यावेळेस काळबादेवी, झव्हेरी बाजार परिसरात कंपनीचे मुख्य कार्यालय होते. पूर्वी ही कंपनी सोन्याच्या दागिन्यांची ट्रेडिंग करत होती. यावेळी जिगर जगडा याने त्यांना दागिने बनवून त्याची विक्री केल्यास कंपनीला चांगला फायदा होईल असा प्रस्ताव दिला होता.
हा प्रस्ताव आवडल्याने कंपनीने अंधेरी येथे दागिने बनविण्याचे एक युनिट सुरु केले होते. तिथेच जिगर हा कास्टिंग विभागात मॅनेजर म्हणून काम पाहत होता. तो त्याच्या हाताखालील कामगारांना मेल्टिंग करुन कास्टिंग केलेले सोने देणे, सायंकाळी कामगारांनी तयार केलेले सोन्याचे दागिने, सोन्याची लगड जमा करणे, त्याची तपासणी करुन त्याची रजिस्ट्ररमध्ये नोंद करणे आदी तसेच डिस्पॅच विभागाचे काम चेतन सोनी तर निकेश वाया हा वेंडर मॅनेजमेंट आणि पर्चेस विभागाचे काम पाहत होता. सुरुवातीला सर्व काम सुरळीत सुरु होते, मात्र नंतर व्यवसायात नुकसान होऊ लागले. त्यामुळे विकास गन्ना यांनी मॅनेजरसह कास्टिंग रुममध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावून घेतले होते. मॅनेजरसह कारागिरांची तपासणीसाठी काही सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्याला जिगर, चेतन अणि निकेश यांनी विरोध केला होता. मात्र विरोधानंतर ही तपासणी सुरु ठेवण्यात आली होती. त्यांच्या कंपनीत दोन महिन्यानंतर सोन्याचे स्टॉक, बनविलेले दागिने आणि वेस्टेज सोने आदीची तपासणी केली जात होती. त्यात एप्रिल-मे २०२३ या दोन महिन्यांत ७१० ग्रॅम वजनाचे सोने कमी दिसून आले.
या प्रकरानंतर विकास गन्ना यांनी जिगर आणि चेतनकडे विचारणा केली होती. त्यांनी कारागिरांवर आरोप करुन या प्रकरणात त्यांचाकाहीही संबंध नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर २०२४ साली स्टॉप तपासणीदरम्यान आणखीन काही दागिन्यांची लूट आढळून आली होती. याबाबत शहानिशा केल्यानंतर गेल्या काही वर्षांत कंपनीत मोठ्या प्रमाणात संशयास्पद व्यवहार सुरु असल्याचे तसेच काहीजण सोने चोरी करुन ते सोने कंपनीच्या बाहेर नेत असल्याचे समजले होते. इतकेच नव्हे तर आरोपींनी ३९ लाख २१ लाख ६२० रुपयांचे सोन्याचे दागिन्यांचे डिझाईन विकत घेतल्याच्या पावत्या सादर करुन कंपनीची फसवणुक केली होती.
जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत जिगर जगडा, चेतन सोनी, निकेश वाया यांनी कंपनीच्या कारखान्यातून सोने मेल्टिंग करताना दर दिवशी थोडे थोडे करुन २२३५ सोन्याचा परस्पर अपहार केला होता. या सोन्याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये इतकी होती. या तिघांनी अशाच प्रकारे इतर तीन ते चार किलो सोन्याचा अपहार केल्याचा रजिस्ट्ररसह नोंदीवरुन उघडकीस आले होते. या संपूर्ण कटात जिगर जगडा याला चेतन सोनेी, निकेश वाया आणि हरेंद्र खुशवाह या तिघांनी मदत केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच विकास गन्ना यांनी चारही आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित चारही आरोपीविरुद्ध ३ कोटी ३९ लाख रुपयांचा सोन्याचा अपहार करुन फसवणुक करणे, बोगस दस्तावेज बनवून कंपनीची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच ते चौघेही पळून गेले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच गेल्या चार महिन्यांपासून पळून गेलेल्या जिगर जगडा आणि चेतन सोनी या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनी कंपनीतील सोन्याचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर चेतन आणि जिगर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून अपहार केलेले सोने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.