माहीम येथे भरस्त्यात चाकू हल्ला करणारा हल्लेखोर गजाआड

चालातना धक्का लागून मोबाईल पडला म्हणून चाकूने भोसकले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जून २०२६
मुंबई, – माहीम येथे भरस्त्यात एका तरुणावर चाकूने हल्ला करुन पळून गेलेल्या हल्लेखोराला अखेर माहीम पोलिसांनी अटक केली. मोहम्मद अनस खान असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चालताना धक्का लागून मोबाईल खाली पडून नुकसान झाले म्हणून आरोपीने नवीन सुभाष प्रसन्न याच्यावर चाकूने भोसकले होते. या हल्ल्यानंतर तो पळून गेला होत, मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत त्याला गुन्ह्यांतील चाकूसह पोलिसांनी शिताफीने अटक केली.

ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजता माहीम रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट मार्ग, बाटा शू मार्टजवळ घडली होती. नवीन प्रसन्न हा त्याच्या कुटुंबियांसोबत माहीमच्या पितांबर लेन, कुरेशी महल परिसरात राहतो. सध्या तो लोअर परेल येथील एका खाजगी कंपनीत ऑफिसबॉय म्हणून काम करतो. गुरुवारी सकाळी आठ वाजता तो नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. काम संपल्यानंतर रात्री दहा वाजता तो लोअर परेल येथून माहीम रेल्वे स्थानकात आला. रेल्वे स्थानकातून पायी घराच्या दिशेने जाताना बाटा शूट मार्टजवळ त्याचा एका व्यक्तीला चालताना धक्का लागला होता. त्यामुळे त्या व्यक्तीचा मोबाईल खाली पडला आणि त्याचे मोबाईलचे नुकसान झाले होते. यावेळी त्याने त्याला सॉरी म्हणून चालताना चुकून धक्का लागल्याचे सांगितले.

मात्र त्याने त्याला अश्‍लील शिवीगाळ करुन त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. तो त्याला चुकून धक्का लागला, माफ कर असे बोलूनही तो त्याचा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मोबाईलचे नुकसान भरुन दे नाहीतर तुझा गेमच करतो अशी धमकीच त्याने त्याला दिली होती. त्यांच्यातील वाद सुरु असतानाच अचानक त्याने त्याच्याकडील चाकूने नवीन प्रसन्न याच्यावर वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हा प्रकार तेथून जाणार्‍या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेले लोक तेथून निघून गेले.

हा प्रकार नंतर नवीनने त्याच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्तबंबाळ झालेल्या नवीनला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी नवीन प्रसन्नची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या मोहम्मद अनस खान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच नवीनवर चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page