ड्रग्जच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या आरोपीस अकरा वर्षांनी अटक

खटल्याच्या सुनावणीसाठी गैरहजर राहत असल्याने जाहीरनामा जारी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जून २०२६
मुंबई, – ड्रग्जच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस अकरा वर्षांनी वांद्रे पोलिसांनी अटक केली. हनीफ मुराद फाकी असे या ४३ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. जामिनावर बाहेर येताच तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता, त्यामुळे त्याच्याविरुद्ध वांद्रे कोर्टाने जाहीरनामा जारी केला होता. अखेर अकरा वर्षांनी त्याला फेरअटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हनीफ फाकी हा माहीम येथील गौसिया मशिदीजवळील जनता सेवक सोसायटीमध्ये राहत होता. जानेवारी २०१४ रोजी त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या वकिलाने त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होताच त्याला कोर्टाने जामिन मंजूर केला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता.

खटल्याच्या सुनावणीसाठी तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाने जाहीरनामा जारी करुन त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे वांद्रे पोलिसांना आदेश दिले होते. या आदेशानंतर त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांच्या हातावर गुंगारा देत होता. गेल्या अकरा वर्षांपासून तो फरार होता. तरीही त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना हनीफ हा माहीम दर्गा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, पोलीस हवालदार इम्तियाज मकानदार, पोलीस शिपाई शमशुद्दीन काझी, घाडगे, राकटे आदी पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून माहीम दर्गा येथे आलेल्या हनीफला ताब्यात घेतले. चौकशीत तो ड्रग्जच्या गुन्ह्यांतील जाहीरनामा जारी झालेला वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला फेरअटक करुन वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page