भरवेगात जाणार्‍या टेम्पोच्या धडकेने वयोवृद्धाचा मृत्यू

अपघातानंतर टेम्पोचालकाचे घटनास्थळाहून पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जून २०२६
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका टेम्पोच्या धडकेने मझहरुल खान या ६८ वर्षांच्या वयोवृद्ध टॅक्सीचालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी धर्मेद्र यादव या टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर तो पळून गेला होता, त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. हा अपघात बुधवारी २४ जूनला सकज्ञाळी साडेअकरा वाजता गोरेगाव येथील आरे पवईकडे जाणार्‍या युनिट क्रमांक २२ जवळ झाला.

इस्तेखार मझहरुल खान हा अंधेरीतील मरोळ सागबाग स्नेह सागर एसआरए सोसायटीमध्ये राहत असून तो चालक म्हणून काम करतो. मृत मझहरुल हे त्याचे वडिल असून तो त्यांच्यासोबतच राहतो. त्याची आई मेहमुनिसा, पत्नी तब्बसूम, मुलगी रुकय्या आणि भाऊ इस्तेयाक असे सर्वजण त्यांच्या उत्तरप्रदेशातील प्रतापगढ, दिलीपपूर, राणीगंज येथे राहतात. त्याचे वडिल टॅक्सीचालक म्हणून काम करतात. बुधचारी सकाळी आठ वाजता ते नेहमीप्रमाणे त्यांच्या कामावर निघून गेले होते.

सकाळी साडेअकरा वाजता ते युनिट क्रमांक २२ जवळ उभे होते. यावेळी तेथून भरवेगात जाणार्‍या एका टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना उठता येत नव्हते. त्यांनी अपघाताची माहिती इस्तेखार यांना दिली. त्यानंतर तो घटनास्थळी गेला आणि त्याने त्याच्या वडिलांना जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

हॉस्पिटलमध्ये मोहम्मद आसिफ सिद्धीकी नावाचा एक तरुण होता. त्याने ज्या टेम्पोने त्यांच्या वडिलांना धडक दिली, त्या टेम्पोचा तो सुपरवायझर असून टेम्पोचालकाचे नाव धर्मेद्र यादव आहे. जखमी मझहरुल यांच्यावर उपचार सुरु असताना दुपारी पावणेदोन वाजता त्यांचे निधन झाले. हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी इस्तेखार खान याच्या तक्रारीवरुन आरे पोलिसांनी टेम्पोचालक धर्मेंद्र यादव याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page