मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जुलै २०२६
मुंबई, – हायटेक पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची चोरी करणार्या एका टोळीचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन आरोपींना गुजरातच्या राजकोट शहरातून पोलिसांनी अटक केली. दिप रमणीकभाई आघेर आणि राहुलभाई भरतभाई धियाल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे गुजरातचे रहिवाशी आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबईसह गुजरात आणि गोवा येथील विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणंमत कुंभारे यांनी सांगितले. आरोपींकडून पोलिसांनी चोरीची ४५ लाखांची एक टोयोटो कारसह इतर साहित्य हस्तगत केले आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
कुंजन जयराज टांक हे सायन येथे राहत असून खार येथील मधुबन टोयोटा शोरुंममध्ये डिलीव्हरी इंचार्ज अधिकारी म्हणून काम करतात. कंपनीचे खारसह कुर्ला, लोअर परेल, बदलापूर, बिच कॅण्डी येथे पाच शोरुम आहेत. त्यांच्या खार येथील शोरुममध्ये ग्राहकांना टेस्ट ड्राईव्हसाठी टोयोटो कंपनीच्या विविध मॉडेलच्या कार उपलब्ध असतात. २४ जूनला एका ग्राहकाला टोयोटो कार टेस्ट ड्राईव्हसाठी हवी होती, त्यामुळे त्यांनी कुर्ला येथील शोरुममधून एक टोयोटो कार आणली होती. ती कार त्यांनी खार येथील एस. व्ही रोडवर पार्क केली होती. दुसर्या दिवशी म्हणजे २५ जूनला ते कामावर आले आणि कार आणण्यासाठी तिथे गेले होते.
यावेळी त्यांना पार्क केलेली ४५ लाखांची टोयोटो कार तिथे दिसून आली नाही. त्यांनी तिथे चौकशी केली, मात्र कोणालाही या कारबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता एका अज्ञात व्यक्तीने ती कार चोरी करुन पलायन केल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी खार पोलिसांना ही माहिती सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पांलीस निरीक्षक संतोष काटे यांनी गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक हणमंत कुंभारे व त्यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात पोलिसांना यश आले. संबंधित आरोपी कार घेऊन दहिसर टोलमार्गे गुजरातला पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे, पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत कुंभारे, पोलीस हवालदार कदम, पोलीस शिपाई कदम, जाधव, लहामगे, सावंत, कोळेकर, भामरे, अहिवळे, खेडकर आणि काकडे आदींचे गुजरातला पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांच्या मदतीने राजकोट येथून दिप आघेर आणि राहुलभाई धिवाल या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही कार चोरी केल्याची कबुली दिली.
या दोघांकडून पोलिसांनी चोरीची ४५ लाखांची टोयोटो कार, ५० हजार रुपये किंमतीचे ब्लूट्यूथ कार स्कॅनर डिवाईस आणि ऐंशी हजार रुपयांचे अप्पल कंपनीचे दोन मोबाईल हस्तगत केले. ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. तपासात एका आरोपीने तांत्रिक ज्ञानाचा वापर करुन वाहनांच्या सुरक्षा यंत्रणेत हस्तक्षेप करण्यासाठी विशेष उपकरणे, कोडिंगचा वापर केला तर दुसर्या आरोपीने वाहनाचे सुरक्षा फिचर्स निष्क्रिय करुन नंबर प्लेट बदलून चेसिंगमध्ये छेडछाड केल्याचे उघडकीस आले.
ते दोघेही हायटेक पद्धतीने वाहनचोरी टोळीचे सदस्य असून त्यांच्याविरुद्ध खार, सुरत, राजकोट आणि गोवा येथील विविध पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना रविवार ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.