गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाने वयोवृद्ध महिलेची ऑनलाईन फसवणुक
पावणेतेरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ जुलै २०२६
मुंबई, – गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाने एका वयोवृद्ध महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे पावणेतीन लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे. एमजीएल नावाची बोगस एपीके फाईल पाठवून ही फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
६९ वर्षांची महेंद्रा मुस्ताक डोसानी ही वयोवृद्ध महिला अंधैरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहते. तिचे पती बांद्रा सहकारी क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतपेढीत मॅनेजर म्हणून काम करतात तर ती वेळ मिळेल तेव्हा ट्रेडिंगचे काम करते. २८ जूनला सायंकाळी पावणेसात वाजता तिच्या मोबाईलवर एका मॅसेज आला होता. त्यात अज्ञात व्यक्तीने महानगर गॅस कंपनीकडून त्यांचे गॅस कनेक्शन रात्री उशिरापर्यंत बंद केले जाणार आहे. त्यांनी मीटर रिडिंग अपडेट न केल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे तिने मॅसेजमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून दिवेश नावाच्या व्यक्तीशी संभाषण केले होते.
यावेळी त्याने त्यांचे गॅस कनेक्शनचे बिल भरले नसून त्यांनी मीटर रिडींग अपडेट केले नाही. ते तातडीने करा अन्यथा रात्री उशिरा त्यांचे गॅस कनेक्शन बंद केले जाईल. त्यानंतर त्याने त्यांना एमजीएल नावाचे एक एपीके फाईल पाठविली होती. तिने ती लिंक ओपन करुन बारा रुपये भरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने ऑनलाईन पैसे भरण्यास नकार दिला. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने ती लिंक बंद केली होती. दुसर्या दिवशी तिच्या मोबाईलवर काही ओटीपी क्रमांक आले आणि बँकेतून पैसे डेबीट झाल्याचे मॅसेज येऊ लागले.
तिने तातडीने बँकेत जाऊन चौकशी केली असता तिच्या बँक खात्यातून संबंधित अज्ञात सायबर ठगाने सुमारे पावणेतेरा लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईनसह पश्चिम सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे.
डॉक्टरच्या वयोवृद्ध पित्याची ऑनलाईन फसवणुक
दुसर्या घटनेत एका ८० वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे पावणेपाच लाखांची ऑनलाईन फसवणुक केली. ही महिला पवईतील हिरानंदानी परिसरात राहत असून व्यवसायाने डॉक्टर आहे. ७ जुलैला दुपारी सव्वाच्या सुमारास तिचय वडिलांना जॉन डिसुझा नावाच्या एका व्यक्तीचा मॅसेज आला होता. त्यात त्याने त्यांचा गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी मॅसेजमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता.
यावेळी समोरील व्यक्तीने तो महानगर गॅसचा प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांचे गॅसचे बिल पेंडींग असून अपडेट झालेले नाही. त्यासाठी त्याने त्यांना एक एपीके फाईल पाठवून गॅस कनेक्शन अपडेट करण्यास सांगितले. तो महानगर गॅस कंपनीचा प्रतिनिधी समजून त्यांनी ती लिंक ओपन करुन त्यात त्याची माहिती भरली होती. दुसर्या दिवशी त्यांना बँकेतून काही मॅसेज प्राप्त झाले होते. त्यात त्यांना त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले. या व्यवहारातून त्यांच्या खात्यातून ४ लाख ७९ हजार डेबीट झाले होते.
हा प्रकार नंतर त्यांनी त्यांच्या तक्रारदार डॉक्टर मुलीला सांगितला होता. त्यांचे वय जास्त असल्याने त्यांच्या वतीने तिने पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.