संचालक पदाची ऑफर देऊन निवृत्त साऊंड रेकॉर्डर वयोवृद्धाला गंडा
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीस तीन महिन्यानंतर अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जुलै २०२६
मुंबई, – कंपनीत संचालक पदाची ऑफर देऊन साऊंड रेकॉर्डर म्हणून निवृत्त झालेल्या एका ७५ वर्षांच्या वयोवृद्धाकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस तीन महिन्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. रिनकॉन विजय नारायणन असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याची पत्नी लोपलमुद्रा रिनकॉन नारायणन सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी फसवणुकीच्या उद्देशाने आर्थिक मदतीच्या मोबदल्यात चांगला परतावा देतो असे सांगून वयोवृद्ध तक्रारदाराला गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
७५ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार सतीश लक्ष्मीचंद्र गुप्ता हे बोरिवलीतील रहिवाशी आहे. ते विविध संगीत कंपन्यांमध्ये साऊंड रेकॉर्डर म्हणून २००८ साली निवृत्त झाले असून त्यांचा मुलगा सुदीप गुप्ता हा सध्या ऑस्ट्रेलिया येथे नोकरी करतो. चार वर्षांपूर्वी त्यांना रिनकॉन या व्यक्तीने कॉल करुन तो एल. आर म्युझिक प्रायव्हेट लिमिटेड आणि एल. आर स्पेस ऑर्गनायझेशन प्राव्हेट लिमिटेड या दोन कंपनी सुरु करत असून त्यासाठी त्याला अनुभवी साऊंड रेकॉर्डरची गरज आहे. त्याने कंपनीचे सर्व व्यवस्थापन करावे, इतकेच नव्हे तर त्याने त्यांना कंपनीत संचालक पदाची ऑफर दिली होती. ही ऑफर चांगली वाटल्याने ते रिनकॉनला भेटण्यासाठी गोरेगाव येथे गेले होते. तिथे त्यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती.
या भेटीत त्याने त्याचा अनेक व्यावसायिक उपक्रम सुरु असून त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे भारत आणि इस्त्रो यांच्या सहकार्याने भारताचा पहिला ८ के सॅटेलाईट लॉच करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले होते. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगून त्याने त्याच्या उपक्रमासाठी त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली, मात्र त्यांनी त्याला ती रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने उपक्रमाचा विषय सोडून कंपनीत गुंतवणुकीसाठी त्यांच्याकडे पैशांची सुरु केली होती. त्यासाठी त्याने त्यांना चांगला परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले होते. त्याचा विश्वास बसावा म्हणून संचालक पदासाठी त्यांच्याकडून एक फॉर्म भरुन घेतला.
जानेवारी २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत त्यांनी टप्याटप्याने लोपलमुद्रा नारायणन हिच्या बँक खात्यात ९ लाख ९ हजार ३३७ रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र त्यांना कंपनीचे संचालक न करता त्यांच्याकडून डिजीटल सिग्नेचर घेतले होते. त्यानंतर ते दोघेही कंपनीचे काम सुरु असून सॅटेलाईट लॉंचसाठी पैसे पाठविण्यात आल्याचे सांगत होते. या कामासाठी आणखीन पैशांची गरज लागणार असून त्यांना पैशांची व्यवस्था करण्याची विनंती करत होते. मात्र त्यांनी आणखीन पैसे देण्यास नकार दिला होता. त्यानंतर रिनकॉन आणि लोपलमुद्रा हे दोघेही त्यांचा कॉल घेण्याचे टाळत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते.
कंपनीच्या स्थापनेबाबत विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी गुंतवणुक केलेली व्याजासहीत परत करण्यासाठी आग्रह धरला होता. यावेळी त्यांनी त्यांना काही धनपादेश दिले होते. मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. चौकशीनंतर रिनकॉनने पेमेंट स्टॉप करण्यास सांगितले आहे असे बँक अधिकार्यांनी सांगितले. काही दिवसांनी त्यांनी त्यांना ५० हजार रुपये दिले, मात्र वारंवार विचारणा करुनही उर्वरित ८ लाख ५९ हजार ३३७ रुपये परत न करता त्यांची फसवणुक केली होती.
या प्रकारानंतर सतीश गुप्ता यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मार्च २०२६ रोजी रिनकॉन आणि लोपलमुद्रा नारायणन यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या रिनकॉनला तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.