अंधेरीतील ऑनलाईन चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
वेश्यादलाल महिलेविरुद्ध गुन्हा दाखल तर तीन तरुणींची सुटका
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जुलै २०२६
मुंबई, -अंधेरीतील एका ऑनलाईन चालणार्या सेक्स सेक्स रॅकेटचा वर्सोवा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी उर्वीबेन नावाच्या एका ३५ वर्षांच्या महिलेविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून मेडीकलनंतर या तिघींनाही जोगेश्वरीतील सखी वनस्टॉप सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. उर्वीबेन ही मोबाईलवरुन ग्राहकांच्या मागणीनुसार काही तरुणांना शहरातील विविध हॉटेल, गेस्ट हाऊस तसेच लॉजमध्ये शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
उर्वीबेन ही महिला मालाड परिसरात राहत असून ती सेक्स रॅकेट चालवते. ग्राहकांच्या मागणीनुसार तिच्या संपर्कात असलेल्या तरुणींना संबंधित ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यसाठी पोलिसांनी तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन एका बोगस ग्राहकाच्या मदतीने तिला संपर्क साधला होता. या बोगस ग्राहकाने तिला संपर्क साधून तिच्याकडे तीन ते चार तरुणींची मागणी केली होती. यावेळी मोबाईलमध्ये त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. ठरल्याप्रमाणे उर्वीबेनने त्याला अंधेरीतील वर्सोवा, चारबंगला, म्हाडाजवळील एका हॉटेलजवळ बोलाविले होते.
गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी तिथे उर्वीबेन ही तीन तरुणींसोबत आली होती. यावेळी बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना तिथे पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी उर्वीबेनला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या तावडीतून २५ ते २७ वयोगटातील तिन्ही तरुणींची सुटका केली. या तरुणींच्या चौकशीतून ती ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. तिच्या सांगण्यावरुन त्या तिघीही ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी तिथे आल्या होत्या.
ग्राहकांकडून मिळणारी काही रक्कम त्यांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम उर्वीबेन ही स्वतकडे ठेवत होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तिन्ही तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते, मेडीकलनंतर त्यांना जोगेश्वरीतील सखी वनस्टॉप सेंटरमध्ये पाठविण्यात आले.