फसवणुकीच्या गुन्ह्यांतील व्हाईट कॉलर गुन्हेगाराला अटक
जामिनावर बाहेर आल्यानंतर आठ वर्षांपासून फरार होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जुलै २०२६
मुंबई, – फसवणुकीच्या सहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असलेला रेकॉर्डवरील व्हाईट कॉलर गुन्हेगाराला आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अभिषेक व्यास असे या गुन्हेगाराचे नाव असून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पळून गेला होता, अखेर आठ वर्षांनी त्याला फेरअटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
अभिषेक व्यास व्यवसायाने बिल्डर असून त्याची मेसर्च ए ऍण्ड ए शेल्टर नावाची एक खाजगी कंपनी होती. याच कंपनीत तो व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होता. २०१५ ते २०१६ या कालावधीत कंपनीने अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केली होती. या फसवणुकीनंतर संबंधित तक्रारदारांनी विविध पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची सहा गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेत वर्ग करण्यात आला होता. २०१५ साली अभिषेक व्याससह इतर आरोपीविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत चार तर २०१६ साली दोन असे सहा फसवणुकीचे गुन्हे वर्ग झाले होते. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.
या सहाही गुन्ह्यांत त्याच्यासह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने त्याच्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला कोर्टाने जामीन दिला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो २०१८ पासून फरार झाला होता. खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध किल्ला कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. या वॉरंटनंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसानी विशेष मोहीम हाती घेतली होती,
मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरुच ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो सांताक्रुज येथील ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रितम बनावली, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरश्रील पटेल, पोलीस हवालदार रघुनाथ बर्गे या पथकाने त्याला ताज हॉटेलमधून ताब्यात घेतले. चौकशीत फसवणुकीच्या गुन्ह्यांतील गेल्या आठ वर्षांपासून वॉण्टेड असलेला तोच आरोपी असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत त्याला फेरअटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.