दोन वेगवेगळ्या घटनेत तरुणीसह दोघांवर प्राणघातक हल्ला

मालाड-गोरेगाव येथील दोन्ही घटनेने तणावाचे वातावरण

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जुलै २०२६
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत एका तरुणीसह दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गोरेगाव आणि मालाड परिसरात घडली. याप्रकरणी कुरार आणि बांगुरनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यातील एका गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली तर दुसर्‍या गुन्ह्यांतील तिन्ही आरोपींच्या अटकेसाठी कुरार पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोन्ही घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पहिली घटना गुरुवारी दुपारी साडेबारा ते तीनच्या सुमारास मालाड येथीलल कुरारगाव, गांधीनगर, जय बजरंग चाळीत घडली. कचंन दिननाथ तिवारी ही २४ तरुणी याच परिसरात राहत असून सध्या शिक्षण घेते. गुरुवारी दुपारी ती पाणी भरत असातना तिथे शिवम सिंग, राहुल ऊर्फ आडी विश्‍वकर्मा व अन्य एक तरुण आले. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करतेस का, तुझा आज गेम करतो असे बोलून तिला शिवीगाळ करुन रबरासारख्या दिसणार्‍या वायरने बेदम मारहाण केली. काही वेळानंतर त्यांनी त्यांच्याकडील चाकूने कंचनसह तिचा भाऊ आणि इतरांना धमकावून मध्यस्थी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच कुराार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दुसर्‍या घटनेत भांडणात मध्यस्थी केली म्हणून सागर आनंद कदम नावाच्या एका ३० वर्षांच्या चालकावर रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात सागर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कांदिवलीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच बबलू राजेंद्र वनियार या गुन्हेगाराला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. सागर हा त्याच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव येथील शहिद भगतसिंग नगर क्रमांक एक, हनुमान गल्लीत राहत असून चालक म्हणून काम करतो. याच परिसरात बबलू आणि विवेक गडदे हे राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. बबलू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येसह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे.

बुधवारी रात्री साडेअकरा वाजता सागर हा विवेकसोबत न्यू लिंक रोड, विना अपार्टमेंट, बीएमसी मैदानासमोर बोलत होते. यावेळी तिथे बबलू आला आणि त्याने विवेकला पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली, यावेळी सागरने त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. या दोघांची समजूत काढून त्यांना त्यांच्या घरी पाठवून दिले होते. रात्री उशिरा पुन्हा सागर आणि विवेक हे दोघेही गप्पा मारताना तिथे बबलू आला आणि त्याने भांडणात मध्यस्थी केली म्हणून सागरला शिवीगाळ करुन आज तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने त्याच्याकडील चाकूने सागरवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर बबलू तेथून पळून गेला.

यावेळी स्थानिक रहिवाशांनी जखमी झालेल्या सागरला कांदिवलीतील जीईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या सागरची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी बबलू वनियार याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या बबलूला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बबलू हा सराईत रेकॉर्डवरल गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, मारामारी, गंभीर दुखापत, घरफोडी आदी सात गंभीर गुन्ह्यांची नोदं असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page