अकरा लाखांच्या पीव्हीसी कोटींग कॉपर वायर चोरीचा पर्दाफाश
नऊ लाखांच्या चोरीच्या कॉपर वायरसह दोन आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२६
मुंबई, – सुमारे अकरा लाखांच्या पीव्हीसी कोटींग असलेल्या कॉपर वायरच्या ८६ गोणी चोरी करुन पळून गेलेल्या एका टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे नऊ लाखांच्या पीव्हीसी कोटींग वायरचा साठा जप्त केला आहे. राजूसिंग गोपाळसिंग सिसोदिया आणि सुयश विजय सावंत अशी या दोघांची नावे असून पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नितीन भिमराव बारपटे हे भिवंडीतील काल्हेरचे रहिवाशी आहेत. सध्या ते अंधैरीतील मरोळ एमआयडीसी परिसरात असलेल्या ईव्हीआयओ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीला इलेक्ट्रीकल हाऊस वायरिंगचे कॉन्ट्रक्ट एल ऍण्ड टी कंपनीकडून मिळाले होते. त्यासाठी कंपनीने नवीन इमारतीसाठी लागणारे वायरिंगचे साहित्य पवईतील साकिविहार रोड, लार्सन ऍण्ड ट्रर्बो कंपनीच्या कार्यालयातील गोदामात ठेवले होते. २५ जूनला दिवसभरातील काम संपल्यानंतर त्यांच्या कंपनीचे सुपरवायझर गुफरान यांनी कंटेनरमधील सामान तपासून दरवाजा बाहेरुन लॉक करुन घरी गेले होते.
दुसर्या दिवशी सकाळी काही कामगार तिथे आले होते. यावेळी त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी इंचार्ज निलेश जाचक यांना ही माहिती दिली. या माहितीनंतर ते तिथे गेले होते. आतील कंटेनरमधील सामानाची तपासणी केल्यानंतर त्यांना अज्ञात व्यक्तींनी पीव्हीसी कोटींग असलेले कॉपर वॉयर चोरी केल्याचे दिसून आले. त्यात व्हीपीसी कोटींग असलेले दहा बंडल दिड स्वेअरचे सात किलो वजनाचे कॉपर वायरचे ६८ गोणी, पाच बंडल अडीच स्वेअरचे दहा किलो वजनाचे कॉपर वायरचे ८ गोणी, तीन बंडल चार स्वेअरचे पंधरा किलो वजनाचे कॉपर वायरची एक गोणी, एक बंडल सहा स्वेअरचे वीस किलो वजनाचे कॉपर वायरचे ९ गोणी आदी सुमारे अकरा लाख रुपयांचा मुद्देमालाचा समावेश होता. घटनास्थळी पोलिसांना एका गाडीच्या टायरचे मार्क दिसून आले.’
रात्री उशिरा अज्ञात चोरट्याने कंपनीच्या गोदामात प्रवेश करुन पीव्हीसी कोटींग असलेले ८६ गोणी कॉपर वायर चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर कंपनीच्या वरिष्ठांना देण्यात आली होती. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत नितीन बारपटे यांना पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या वतीने पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. कार्यालयातील गोदामासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. ‘
या फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने राजूसिंग सिसोदिया आणि सुयश सावंत या दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीत असताना त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे नऊ लाखांचा चोरीचा कॉपर वायरचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी या दोघांनाही पुन्हा लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.