कौटुंबिक वादातून माता-पित्यावर मुलाकडून चाकूने हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत मुलाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२६
मुंबई, – कौटुंबिक वादातून रागाा भरात मुलानेच त्याच्या माताध-पित्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परसिरात उघडकीस आले आहे. या हल्ल्यात इजाज कुरेशी आणि मेमुना इजाज कुरेशी असे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन २७ वर्षांचा आरोपी मुलगा नबिल कुरेशी याला अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
ही घटना शनिवारी सकाळी पावणेअकरा वाजता अंधैरीतील वर्सोवा-यारी रोड, मोती अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या एफ ४७ मध्ये हाजिक इजाज कुरेशी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून ते सिव्हील इंजिनिअर म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी त्यांचे वडिल इजाज आणि आई मेमुना यांच्यात क्षुल्लक कारणावरुन कौटुंबिक वाद झाला होता. या वादातून रागाच्या भरात घरात असलेला त्यांचा मोठा भाऊ नबिलने त्यांचे वडिल इजाज यांच्या चेहर्यावर चाकूने वार करुन त्यांना गंभीर दुखापत केली होती. त्यानंतर त्याने त्याची आई मेमुना हिच्या चेहर्यावर आणि हातावर अशाच प्रकारे चाकूने हल्ला केला होता. त्यात ते दोघेही जखमी झाले होते.
अचानक आरडाओरड झाल्याने स्थानिक रहिवाशांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी त्यांना घडलेला प्रकार निदर्शनास आले. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही पती-पत्नींना तातडीने हाजिकसह स्थानिक रहिवाशांनी जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हाजिक कुरेशी याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याचा मोठा भाऊ नबिल कुरेशी याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. नबिल हा काहीच कामधंदा करत नाही. गेल्या दोन वर्षांपासून तो मानसिक तणावात होता. त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून तो औषधे घेत नव्हता. त्यात शनिवारी सकाळी झालेल्या भांडणाला कंटाळून त्याने त्याच्या माता-पित्यावर चाकूने हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांनी दुजोरा दिला आहे.