अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन खंडणीसाठी धमकी
चार महिन्यांत खंडणी स्वरुपात सव्वानऊ लाख उकाळल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२६
मुंबई, – अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका कॉलेज तरुणाला दोघांनी खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. त्यात एका महिलेचा समावेश असून या दोघांनी चार महिन्यांत तक्रारदार तरुणाकडून सुमारे सव्वानऊ लाखांची खंडणी वसुल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी खंडणीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.
२१ वर्षांचा तक्रारदार तरुण गोरेगाव येथील बांगुरनगर परिसरात राहत असून सध्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिकतो. त्याचे स्नॅपचॅट या सोशल साईटवर एक अकाऊंट आहे. मार्च महिन्यांत त्याची आहाना नावाच्या एका तरुणीशी ओळख झाली होती. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यानंतर ते दोघेही चॅटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान तिने त्याला व्हिडीओ कॉल केला होता. त्याला कपडे काढण्यास प्रवृत्त करुन त्याचे व्हिडीओ पाठविण्यास सांगिलते होते. तिच्यावर विश्वास ठेवून, मैत्रीखातर त्यानेही त्याचे अश्लील व्हिडीओ तिला स्नॅपचॅटवर पाठवून दिले होते.
याच व्हिडीओच्या मदतीने तिने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्याच्याकडे तिच्यासह तिचा मित्र पैशांची मागणी करत होते. त्याने पैसे दिले नाहीतर त्याचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होते. ८ मार्च ते २५ जुलै २०२६ या कालावधीत बदनामीच्या भीतीने त्याने त्यांना ५५ वेळा टप्याटप्याने नऊ लाख तीस हजार रुपये पाठविले होते. ही रक्कम त्याने वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम पाठवूनही ते दोघेही त्याला सतत ब्लॅकमेल करुन त्याच्याकडे खंडणीची मागणी करत होते. या धमकीला तो कंटाळून गेला होता. त्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
शनिवारी तो बांगुरनगर पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित दोन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देणे, खंडणीची रक्कम वसुल करणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. खंडणीची रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.