चांगला परताव्याच्या आमिषाने शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने फसवणुक
दोन महिलांना ३४ लाखांना गंडा घालणार्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२६
मुंबई, – चांगला परताव्याचे आमिष दाखवून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन दोन महिलांची सुमारे ३४ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रुही आरिफ शहा ऊर्फ स्नेहल मारुती कांबळे या ३५ वर्षांच्या आरोपी महिलेविरुद्ध वरळी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे फसवणुक करणारी ही सराईत टोळीने असून या टोळीत तिचे इतर काही सहकारी आहेत. त्यांनी चांगल्या परताव्याचे गाजर दाखवून अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरळी पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे.
प्रिया संजय भगत ही ३९ वर्षांची महिला वरळीतील पांडुरंग बुधकर मार्ग, महालक्ष्मी सोसायटीमध्ये राहत असून तिचे पती व्यावसायिक आहेत. पूर्वी तिचे पती संजय भगत हे केबल ऑपरेटर म्हणून काम करत होते. त्यामुळे ते ग्राहकांकडून दरमाह केबलचे भाडे घेण्यासाठी प्रत्येक घरात जात होते. त्यातून त्यांची रुही ऊर्फ स्नेहलची ओळख झाली होती. ती पासपोर्ट कार्यालयाजवळील गुरुकृपा सोसायटीमध्ये राहत होती. गेल्या तेरा वर्षांपासून ती त्यांच्या परिचित असल्याने त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान तिने त्यांच्याकडून होलसेलमध्ये साखरेचा व्यवसाय करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे संजयने तिला व्यवसायात आर्थिक मदत केली होती. दिलेल्या मुदतीत पैसे परत करुन तिने त्यांचा विश्वास संपादन केला होता.
याच दरम्यान तिच्या फ्लॅटबाबत एक इश्यू झाला होता. त्यातही प्रिया आणि संजय भगत यांनी तिची मदत केली होती. या मदतीची परतफेड म्हणून तिने त्यांना तिची शेअरमार्केटमध्ये प्रचंड ओळख आहे. तिने विनोद जुवेकर, मुकेश नारकर आणि प्रविण पवार यांच्या मदतीने अनेकांचे पैसे शेअरमार्केटमध्ये गुंतविले असून त्यात त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे तिने त्यांनीही शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिच्यामार्फत शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी तिला १८ लाख ५६ हजार रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात एक करार झाला होता.
मात्र दिलेल्या मुदतीत तिने त्यांना कुठलाही परतावा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ती वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी तिच्याकडे शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी तिने ती व्यवसायाने वकिल असून पैशांची मागणी केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली होती. चौकशीदरम्यान तिचा वकिली क्षेत्राशी काहीही संबंध नसून ती अनेकांना ती वकिल असल्याचे सांगत होती. सोशल मिडीयावर तिने ऍड. रुही शहा नावाने एक बोगस अकाऊंट उघडले होते. त्यामुळे तिच्या फसवणुकीला अनेकजण बळी पडले होते. ती लोकांकडून वेगवेगळे कारण सांगून पैसे घेत होती, मात्र कोणालाही पैसे न देता त्यांना धमकी देत असल्याचे उघडकीस आले.
याच दरम्यान त्यांना रुही शहाने प्रभादेवी येथे राहणार्या प्रिती प्रशांत शिरसाठ या महिलेस शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परताव्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी तिच्याकडून २५ लाख रुपये घेतले होते, मात्र तिला कुठलाही परतावा न देता तिची फसवणुक केली होती. तिने पैशांची मागणी केल्यानंतर रुहीने तिला धमकाविले होते. अशा प्रकारे रुहीने प्रियासह प्रिती शिरसाठ या दोघींकडून चांगला परताव्याचे आमिष दाखवून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी ३४ लाख ५६ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच प्रिया भगतने घडलेला प्रकार वरळी पोलिसांना सांगून तिच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रुही शहा ऊर्फ स्नेहल कांबळे हिच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तिने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का, या गुन्ह्यांत तिचे पार्टनर असलेले विनोद जुवेकर, प्रविण पवार, शोभा कांबळे आणि मुदुला कांबळे यांचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.