मनी लॉड्रिुंगच्या गुन्ह्यंत अटकेची भीती दाखवून ७.८९ कोटीची फसवणुक
वयोवृद्ध व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जुलै २०२६
मुंबई, – मनी लॉड्रिुंगच्या गुन्ह्यंत डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एका वयोवृद्ध टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगांनी ७ कोटी ८९ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. खरे सायबर सेलचे अधिकारी तक्रारदाराच्या घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि त्यांच्या तक्रारीवरुन पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने संबंधित अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ५ जुलै ते १८ जुलै या कालावधीत सायबर ठगांनी तक्रारदारांना वेगवेगळ्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
७३ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार केरसी काली दुबाश हे गेल्या ६८ वर्षांपासून अंधेरीतील एस. व्ही रोड, एन. भरुचा बागमध्ये एकटेच राहतात. त्यांचा स्वतचा हिमालयन हॉलीडेज नावाचे टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय होता. मात्र काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते घरीच असतात. ५ जुलैला ते त्यांच्या घरी असताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला होता. त्याने तो दिल्लीचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडे नोंद असलेल्या एका गुन्ह्यांत त्यांच्या आधारकार्डचा वापर झाला आहे. याच आधारकार्डवरुन एका बँकेत खाते उघडण्यात आले होते. या खात्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप करुन त्यांची चौकशी करायची आहे असे सांगितले. या व्हॉटअप क्रमांकावर दिल्ली पोलिसांचा लोगो होता. त्यामुळे त्यांना संबंधित व्यक्ती दिल्ली पोलीस दलातील पोलीस अधिकारी असल्याचे समजून त्याच्यावर विश्वास ठेवला होता.
संबंधित् प्रकरण देशाचा सुरक्षेच्या संदर्भातील असल्याने याबाबत कुठेही वाच्यता करु नका, चौकशीची माहिती कोणालाही सांगू नका असे सांगितले होते. त्यानंतर त्यांना दुसर्या मोबाईलवरुन अन्य एका पोलीस अधिकार्याने व्हिडीओ कॉल केल ाहेता. त्याने स्वतचे नाव राहुल गुप्ता सांगून तो सध्या दिल्ली पोलीस दलात कामाला असल्याचे सांगितले. दिल्लीत नरेश गोयल यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यांशी संबंधित तुमची चौकशी होणार आहे. त्यांच्या आधारकार्डचा वापर झालेल्या बँक खात्यात मनी लॉड्रिुंगचे सात कोटी रुपये आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची भीती त्याने त्यांना दाखविली होती. त्याचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांच्या अटकेचे वॉरंट व्हॉटअप पाठविले होते.
या प्रकाराने ते प्रचंड घाबरले, त्यांनी त्यांचा या गुन्ह्यांशी काहीही संबंध नाही. त्यांच्या बँक खात्यात कधीच सात कोटी आले नाही असे सांगितले. तरीही तो त्यांचे काहीही ऐकत नव्हता. सतत कॉल करुन तो त्यांच्याविषयी चौकशी करत होते. त्यामुळे तेदेखील त्यांना माहिती सांगत होते. याच दरम्यान त्यांना निशा पटेल नाव सांगणार्या एका महिलेने कॉल करुन ती दिल्ली सायबर विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तिच्याकडे त्यांच्या केसचा तपास सुरु असून तिने त्यांच्या बँक खात्यासह म्युच्यअल फंड, फिक्स डिपॉझिट, इतर बँक ठेवीची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी तिला सर्व माहिती सांगून सहकार्य करण्याचा प्रयत्न केला होता. तिने त्यांना ही रक्कम वेगवगळ्या बँकेत ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले.
हा तपासाचा एक भाग असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते निर्दोष असल्यास त्यांना त्यांची सर्व रक्कम परत मिळेल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी तिला टप्याटप्याने ७ कोटी ८९ लाख ५१ हजार ६३४ रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करुनही ते त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होते. सततच्या कॉलमुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. १७ जुलैला त्यांच्या घरी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलचे काही अधिकारी आले होते. त्यांनी त्यांची सायबर ठगांकडून फसवणुक होत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून प्राप्त झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार संबंधित पोलिसांना सांगितला.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी संबंधित पोलिसांच्या सांगण्यावरुन दिल्ली पोलीस दलातील अधिकारी असल्याची बतावणी करणार्या सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पश्चिम सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. ५ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत संबंधित् सायबर ठगांनी त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यात ७ कोटी ८९ लाख ५१ हजार ६३४ रुपये घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्या सर्व बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.