जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये प्रवेश करताना पंतप्रधान कार्यालयाचा वापर

बोगस ओळखपत्रासह घातक शस्त्रे घेऊन गेलेल्या दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ सप्टेंबर २०२६
मुंबई, – वांद्रे येथील बीकेसी, जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलमध्ये प्रवेश करताना पंतप्रधान कार्यालयातील पीएमओ अधिकारी आणि अंगरक्षक असल्याची बतावणी करुन बोगस ओळखपत्रासह घातक शस्त्रे घेऊन प्रवेश करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच तिघांपैकी दोन आरोपी तरुणांना गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रोहन प्रेमळ पारिख आणि दिलीप राजाराम कुंदे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मुंबईसह नाशिकचे रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, सहा जिवंत काडतुसे, होलीस्टर, मोबाईल जप्त केले आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत प्रथमेश गणेश बागुलसह अन्य एका व्यक्तीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सोमवारी सायंकाळी सहा वाजता वांद्रे येथील बीकेसी, जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलमध्ये पंतप्रधान, भारत सरकार यांच्या कार्यालयाचे बोगस ओळखपत्र दाखवून तीन अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. ही मॉलच्या सुरक्षारक्षकाकडून प्राप्त होताच त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरु केली होती. यावेळी खाजगी सुरक्षारक्षक सनी प्रमोद सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत सायंकाळी पावणेपाच वाजता मॉलमध्ये तीन तरुण आले होते. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर होते, त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी त्यांनी ते तिघेही पंतप्रधान कार्यालयात पीएमओ अधिकारी आणि सुरक्षारक्षक असल्याचे सांगितले. त्यांनी त्यांचे ओळखपत्र दाखविले होते, या ओळखपत्रानंतर त्यांना आतमध्ये सोडून देण्यात आले होते. या जबानीनंतर पोलिसांनी मॉलमधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन मॉलमधून निघून गेलेल्या संबंधित तिन्ही तरुणांचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना रोहन पारिख याला खार येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत तो दिलीप आणि प्रथमेश यांच्यासोबत तिथे आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने नाशिक येथून दिलीप कुंदे याला ताब्यात घेतले होते. या तिघांनी जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये घातक शस्त्रांसह प्रवेश करताना पंतप्रधान कार्यालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करुन बोगस ओळखपत्र देऊन उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याचा बनाव केला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपविण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून एक रिव्हॉल्व्हर, सहा जिवंत काडतुसे, मोबाईलसह इतर साहित्य जप्त केले आहे.

यातील रोहन हा खार येथील बारावा रस्ता, निलिमा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ६०१ तर दिलीप हा नाशिक ग्रामीणच्या लहावित भागूर मार्ग, बालवकवडे, राईल मिल एसआर परिसरात राहतो. तपासात त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील बोगस ओळखपत्र बनविल्याचे उघडकीस आले आहे. त्यात ओळखपत्र देणार्‍या अधिकार्‍यांचे पद नमूद करण्यात आले नव्हते. तसेच ओळखपत्रात देण्यात आलेली तारीख संपुष्टात येणारा कालावधी नमूद करण्यात आलेला नाही. त्यांची बोगस ओळखपत्रे बनविले होते, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध २०५, ३३५, ३३६ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप हा मॉलमध्ये घातक शस्त्रे घेऊन आला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ३७ (१), १३५ कलम लावण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत प्रथमेश बागुल व अन्य एका व्यक्तीचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर, दखलपात्र आणि अजामिनपात्र असल्याने दोन्ही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. आरोपींनी पंतप्रधान कार्यालयात नोकरीस असल्याचे बोगस माहिती सांगितली होती. मात्र त्यांचा या कार्यालयाशी काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलमध्ये तीन तरुणांनी प्रवेश करताना शासकीय ओळखपत्राचा दुरुपयोग केल्याच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी दुजोरार दिला. या तीनपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. दिलीपकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना आहे. ही घटना सोमवारी घडली असून त्याचा मुंबईत होणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोर्‍याशी काहीही संबंध नाही असेही राजतिलक रौशन यांनी सांगितले. जिओ वर्ल्ड प्लीाझा हा एक मॉल आहे. जिथे सर्वसामान्यांना प्रवेश खुला आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने खाजगी सुरक्षा व्यवस्था आहे. आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून या चौकशीतून काही गोष्टींचा खुलासा होणार असल्याचे सांगितले.

दुसरीकडे आरोपींवर झालेले आरोप संवेदनशील विषयाशी संबंधित आहे. त्यामुळे आमच्या स्तरावर योग्य ती पडताळणी आणि पुरेशी चौकशी केल्यानंतर आम्ही यावर निवेदन जारी करु. रोहनची मॉलमधील भेट खाजगी स्वरुपाची होती. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केल्याप्रमाणे त्याचा पंतप्रधानाच्या दौर्‍याशी काहीही संबंध नाही असे रोहन पारिख यांचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page