मनी लॉड्रिुंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून २.५५ कोटीची मागणी
एअरफोर्सच्या निवृत्त अधिकार्याच्या सतर्कमुळे फसवणुकीचा प्रयत्न फसला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ सप्टेंबर २०२६
मुंबई, – मनी लॉड्रिुंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका निवृत्त एअरफोर्स अधिकार्याकडे सायबर ठगांनी २ कोटी ५५ लाखांची मागणी केली, मात्र डिजीटल अरेस्टचा प्रकार नसल्याचे माहित असल्याने त्यांनी दाखविलेल्या सतर्कमुळे सायबर ठगांचा फसवणुकीचा प्रयत्न फसला गेला आहे. त्यांनी ही रक्कम पाठविण्यास स्पष्टपणे नकार देत घडलेल्या प्रकाराची माहिती वडाळा टी टी पोलिसांना देऊन संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे, फसवणुकीचा प्रयत्न करणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
६३ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार श्रीधर आत्माराम बारी हे सायनच्या प्रतिक्षानगरात राहत असून एअरफोर्समधून निवृत्त झाले होते. २ ऑगस्टला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना मुकेशकुमार नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो पालघर येथील पोलीस अधिक्षक कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्याशी विजयकुमार नावाचे पोलीस निरीक्षक बोलणार आहेत असे सांगून त्याने त्यांचा कॉल फॉरवर्ड केला होता. विजयकुमारने त्यांना त्यांच्यावर मनी लॉड्रिुंगचा गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यांतील रक्कम दशहतवादी कारवायांसाठी वापरण्यात आली आहे. त्याचा तपास उत्तरप्रदेशच्या लखनऊच्या ऍण्टी टेरिरिस्ट स्कॉडकडून सुरु आहे. त्यामुळे त्यांना दोन तासांसाठी पालघर येथे हजर राहावे लागेल असे सांगितले.
चौकशीसाठी हजर राहिले नाहीतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल अशी धमकी दिली होती. काही वेळानंतर त्याने त्यांना हजर राहता येत नसेल तर संबंधित पोलिसांना संपर्क साधून त्यांना चौकशीला सहकार्य करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्याने त्यांचा व्हिडीओ कॉल ऍण्टी टेरिरीस्ट स्कॉडकडे ट्रान्स्फर केला होता. यावेळी समोर एक व्यक्ती पोलीस गणवेशात होता. त्याने त्याचे नाव खन्ना असल्याचे सांगितले. त्याने त्यांच्या बँक खात्यात मनी लॉड्रिुंगची रक्कम जमा झाली आहे. त्यांच्या कागदपत्रावरुन कर्नाटकच्या हुबळी, धारवाड येथील एका बँकेत खाते उघडण्यात आले होते.त्यात २ कोटी ५५ लाखांचा व्यवहार झाला आहे. यावेळी त्यांनी त्यांचा कर्नाटकमधील कुठल्याही बँकेत खाते नसून त्यांच्या खात्यात कधीही इतकी मोठी रक्कम जमा झाली नसल्याचे सांगितले.
याच दरम्यान त्याने त्यांना एक पीडीएफ पाठविली होती. ती पीडीएफ उघडून पाहिल्यानंतर त्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) ही गोपनीय चौकशी सुरु असून या चौकशीबाबत कोणाशीही चर्चा करु नका असे नमूद केले होते. त्यानंतर त्यांची प्रेमकुमार आहुजा नाव सांगणार्या एका पोलीस अधिकार्याने चौकशी केली होती. त्याने व्हिडीओ कॉल करुन त्यांना काही प्रश्न विचारली होती. तोदेखील पोलीस गणवेशात असल्याने त्यांनी तपासात सहकार्य केले होते. त्याने त्यांना संबंधित बँक खात्याची माहिती, त्याचे दस्तावेज तसेच बँकेचे डेबीट कार्ड दाखविले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना त्यांच्या खात्यातील सर्व रक्कम एका बँक खात्यात जमा करावी लागेल. चौकशीनंतर त्यांपा क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यात येईल,
ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले. मात्र त्यांनी बँक खात्यातील रक्कम ट्रान्स्फर केली नाही. ते सर्वजण त्यांना २ कोटी ५५ लाख रुपये ट्रान्स्फर करण्यासाठी तगादा लावत होते, नाहीतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करु अशी धम्की देत होते. मात्र त्यांनी पैसे ट्रान्स्फर करण्यास नकार दिला होता. मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टची धमकी देऊन या सायबर ठगांनी त्यांची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यांच्या धमकीला बळी पडले नाही.
घडलेला प्रकार त्यांनी वडाळा टी टी पोलिसांना सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या ठगाविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे, फसवणुक तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. श्रीधर बारी यांच्या सतर्कमुळे या ठगांचा त्यांची फसवणुक करण्याचा प्रयत्न फसला गेला आहे. याबाबत त्याचे पोलिसांकडूनही कौतुक करण्यात येत आहे.