सचिन अहिरच्या घरी नोकराकडून २.६५ कोटीच्या मुद्देमालावर डल्ला
चोरीचा गुन्हा दाखल होताच घरगड्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जुलै २०२६
मुंबई, – महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांच्या घरी त्यांच्याच नोकराने २ लाख ६५ हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच प्रविण रमेश सोलंकी नावाच्या घरगड्याला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. प्रविण हा त्यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वास घरगडी असून त्यांच्याकडे गेल्या घ२४ वर्षांपासून काम करत होता. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या आरोपींकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अलीकडेच सचिन अहिर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड झाली होती. सचिन अहिर यांचा मुलगा कृष्णा अहिर हा वरळीतील गुलरुख इमारतीमध्ये राहतो. त्यांच्याच घरी प्रविण हा घरगडी म्हणून काम करतो. गेल्या २४ वर्षांपासून तिथे काम करत असल्याने प्रविणवर अहिर कुटुंबियांचा प्रचंड विश्वास होता. त्याच्या घरासह कार्यालयातील सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्याला तिथे प्रत्येक वस्तूची माहिती होती. याच माहितीचा गैरफायदा घेऊन त्याने त्यांच्या वरळीतील राहत्या घरी टप्याटप्याने मौल्यवान वस्तू, कॅश आणि इतर साहित्य चोरी करण्यास सुरुवात केली होती. हा प्रकार अहिर कुटुंबियांच्या लक्षात आला होता, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
अलीकडेच त्यांच्या घरातून काही मौल्यवान सोन्याचे दागिने मिसिंग असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कपाटातील सर्व दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात त्यांना घरातील मौल्यवान सोन्याचे, हिर्याचे दागिने, चांदीचे दागिन्यासह वस्तू, कॅश, इतर साहित्य असा २ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी स्थानिक पोलिसांना चोरीची ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. हा तपास हाती येताच पोलिसांनी तपास सुरु केला होता.
सुरुवातीला पोलिसांनी घरातील नोकरांना ताब्यात घेतले होते. त्यात प्रविण सोलंकी याचाही समावेश होता. त्याने या चोरीशी त्याचा काहीही संबंध नसल्याचा कांगावा केला, मात्र पोलिसी इंगा दाखविताच त्याने गेल्या काही महिन्यांत टप्याटप्याने सचिन अहिर यांच्या घरातून ही चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांत त्याला इतर काही आरोपींनी मदत केली होती. चोरीचे दागिने विक्री केल्यानंतर त्याने त्यातून आलेली रक्कम त्याच्यासह त्याच्या सहकार्यांना दिली होती. हा प्रकार उघडकीस येताच प्रविणला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रविणने त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे सांगितल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असून चोरीचा सर्व मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला जाणार असल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.