८० वर्षांच्या वयोवृद्धाची पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

नूर हॉस्पिटलमधील घटनेने रुग्णासह नातेवाईकांमध्ये खळबळ

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – आजाराला कंटाळून एका ८० वर्षांच्या वयोवृद्धाने पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी पायधुनीतील मोहम्मद अली रोडवरील नूर हॉस्पिटलमध्ये घडली. नजमुद्दीन युसूफअली कपाडिया असे आत्महत्या केलेल्या वयोवृद्धाचे नाव आहे. दुपारी घडलेल्या या आत्महत्येच्या घटनेने हॉस्पिटलमधील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

नजमुद्दीन कपाडिया यांना लघवीच्या संसर्गामुळे (युरिनरी इन्फेशन) पायधुनीतील मोहम्मद अली रोडवर असलेल्या नूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने गुरुवारी ३ सप्टेंबरला त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. तिथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना पाचव्या मजल्यावर असलेल्या सामान्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते.

सोमवारी दुपारी अडीच वाजता त्यांनी पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार वैद्यकीय कर्मचार्‍याच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही.

मात्र आजारपणामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून नजमुद्दीन कपाडिया यांनी पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page