चारित्र्यावरुन होणार्‍या भांडणातून पत्नीवर पतीकडून चाकूने हल्ला

पत्नीवर उपचार सुरु तर पळून गेलेल्या पतीचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२६
मुंबई, – चारित्र्याच्या संशयावरुन होणार्‍या भांडणातून रागाच्या भरात अंजली कृष्णा यादव ऊर्फ अंजम्मा या ३० वर्षांच्या महिलेच्या गळ्यावर तिच्याच पतीने चाकूने वार केल्याची घटना सोमवारी सकाळी अंधेरीत परिसरात घडली. या हल्ल्यात अंजली ही गंभीररीत्या जखमी झाल्याने तिच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी डी. एन नगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन हल्ल्यानंतर पळून गेलेल्या आरोपी पती कृष्णा यादव याचा शोध सुरु केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले.

अंजली ही अंधेरीतील गिल्बर्ट हिल, पोलीस बीट चौकीजवळील एका झोपडपट्टीत तिचा पती कृष्णा यादव याच्यासोबत राहत असून कृष्णाचा तिथे इस्त्रीचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते. त्यातून तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिच्या चारित्र्यावर आरोप करुन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर रागाच्या भरात त्याने घरातील चाकूने तिच्या गळ्यावर वार केले होते. त्यात अंजली ही गंभीररीत्या जखमी झाली होती.

रक्तबंबाळ झालेली अंजली जागीच कोसळताच तो तेथून पळून गेला होता. ही माहिती नंतर स्थानिक रहिवाशांकडून डी. एन नगर पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्यासह त्यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या अंजलीला तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे बोलले जाते.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पती कृष्णा यादव याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर अटकेची कारवाई होईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी बोलताना सांगितले. दरम्यान सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page