झटपट श्रीमंतीसाठी एमडी ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न फसला

३२ वर्षांच्या आरोपीस ३५ लाखांच्या एमडीसह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२६
मुंबई, – झटपट श्रीमंतीसाठी एमडी ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न फसला गेल्याने एका ३२ वर्षांच्या आरोपी तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. सोहेल अब्दुल गनी सय्यद असे या आरोपीचे नाव असून तो नालासोपार्‍याचा रहिवाशी आहे. वांद्रे येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आल्यानंतर त्याला वरळी युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३५ लाख ५० हजार रुपयांचा १४२ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने गुरुवार ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात एमडी ड्रग्जच्या तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून सर्वच पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा आणि ऍण्टी नारकोटीक्स सेलला देण्यात आले होते. ही मोहीम सुरु असताना वांद्रे येथील कलानगर जंक्शन परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत घोगरे व अन्य पोलीस पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.

सोमवारी रात्री उशिरा दिड वाजता तिथे एक तरुण आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १४२ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत ३५ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. चौकशीत त्याचे नाव सोहेल सय्यद असल्याचे तसेच तो सध्या नालासोपारा येथे राहत असल्याचे उघडकीस आले. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने एमडी ड्रग्जचा शॉर्टकट अवलंबला होता. या ड्रग्ज विक्रीतून त्याला चांगले कमिशन मिळणार होते. त्यामुळे तो एमडी ड्रग्ज विक्रीसाठी वांद्रे येथे आला होता. मात्र ड्रग्जची डिलीव्हरी करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.

त्याच्याविरुद्ध खेरवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. सोहेल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मारामारीसह गंभीर दुखापत करणे अशा काही गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला ते ड्रग्ज कोणी दिले, तो ड्रग्ज कोणाला देणार होता. त्याने यापूर्वीही ड्रग्जची खरेदी-विक्री केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page